पाकिस्तान सीमेचे बंदोबस्त करणार ‘ऑपरेशन सुदर्शन’


भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सीमा अत्यंत दुर्गम भागांनी बनलेली आहे. त्यामुळे या सीमेवरून दहशतवादी सहजगत्या भारतात घुसखोरी करतात आणि काश्मिरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांची संख्या वाढते. या परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराने एक विशेष मोहीम हातात घेतली आहे. भारत-पाकिस्तान सीमेचा बंदोबस्त करणाऱ्या या मोहिमेचे नाव आहे ऑपरेशन सुदर्शन!

या मोहिमेअंतर्गत एक हजार किलोमीटरच्या सीमेची किल्लाबंदी होणार आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) 1 जुलैपासूनच ही मोहीम हातात घेतली असून त्यावर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यासाठी सरहद्दीवर अवजड यंत्रे नेण्यात आली असून झपाट्याने काम पूर्ण करण्यात येत आहे. येथील मातीच्या टेकड्या सपाट करण्यात येत आहेत. खासकरून सीमा भागात जे टेहळणीचे टॉवर आहेत त्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. जेणेकरून येणाऱ्या दहशतवादी व घुसखोरांवर दुरूनसुद्धा नजर ठेवता येऊ शकेल.

या भागात गवत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. सरकंडा नावाचे हे गवत पावसाळ्यात वाढते आणि ते 7 फुटांपर्यंत वाढते. त्यामुळे आसपासच्या भागावर नजर ठेवणे अवघड जाते. त्याच्या आडून दहशतवादी भारतात प्रवेश करतात. अशा प्रकारचे गवत आणि वृक्ष हटविण्याची कामगिरी या मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आली आहे. सध्या तरी हे काम पंजाब व काश्मिरमध्ये चालू आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात ते भारत-पाकिस्तान सीमेवरील सर्व भागांमध्ये पूर्ण करण्यात येईल. जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्ताशी लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेची लांबी 485 किमी तर पंजाबमध्ये 553 किमी आहे.

सध्या अमरनाथ यात्रा सुद्धा सुरू असून ही यात्रा ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे. या यात्रेच्या निमित्तानेही सरहद्दीवर कठोर पाळत ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ‘घुसखोरी विरोधी ग्रिड’ नावाची ही व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी आघाडीवरील भागांमध्ये (फॉरवर्ड एरिया) हजारो अधिकारी व सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

बीएसएफचे महासंचालक रजनीकांत मिश्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या मोहिमेच्या समाप्तीनंतर त्यातील परिणामांची समीक्षा करतील. त्यानंतर गृह मंत्रालय या मोहिमेच्या अंतिम निष्कर्षाची पडताळणी करेल.

या मोहिमेचे नाव भगवान कृष्णाचे शस्त्र ‘सुदर्शन चक्रा’वरून ठेवण्यात आले आहे. ज्या प्रमाणे सुदर्शन चक्र शत्रूचा नाश करून पुन्हा आपल्या जागी येते त्या प्रमाणे या मोहिमेचे लक्ष्य शत्रूचा नाश करून त्वरित पुन्हा आपल्या जागी परत येणे हे आहे. ‘ऑपरेशन सुदर्शन’चा आणखी एक हेतू पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घुसखोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या बोगद्यांचा शोध घेणे हाही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बीएसएफने घुसखोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या अशा अनेक भुयारांचा शोध लावला आहे.

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून नेहमीच अकारण शस्त्रसंधीचा भंग केला जातो. अनेकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार केला जातो. अशा परिस्थितीत तातडीने चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या जनतेचे आणि प्रदेशाचे रक्षण करणे हा एकमेव पर्याय भारतीय लष्करापुढे विशेषत: सैन्यदल आणि सीमा सुरक्षा बलांपुढे राहतो. पाकिस्तानतर्फे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया, ही देशासाठी कायमच चिंतेची बाब राहिली आहे. भारताने याबाबत पाकिस्तानला वारंवार दक्षतेचा इशाराही दिला आहे.

त्यामुळे पाकिस्तान, चीन आणि बांग्लादेशाला लागून असलेली सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने बहुआयामी धोरण स्वीकारले आहे. यात 24 तास देखरेख, सीमेवर गस्त, सीमा भागात रस्ते बांधणी यासह इतर अनेक तरतुदींचा समावेश आहे. त्यातही पाकिस्तानसोबतची सीमा भक्कम करण्यासाठी सरकारला अधिक प्रयत्न करावे लागत आहेत. भारत-पाक सीमेलगत कुंपण आणि मोठे प्रकाशझोत उभारायचे काम म्हणूनच हाती घेण्यात आले आहे. ऑपरेशन सुदर्शन हा त्याचाच पुढचा भाग म्हणायला पाहिजे.

आपण मित्र निवडू शकतो, शेजारी निवडू शकत नाही असे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा म्हटले होते. भारताच्या दुर्दैवाने त्याला पाकिस्तानसारखा शेजारी मिळाला आहे ज्याला स्वतःच्या प्रगतीची चिंता नाही मात्र भारताला आडवे जाण्यातच रस आहे. अशा नाठाळ शेजारी-वजा-शत्रूला वठणीवर आणण्यासाठी श्रीकृष्णाचे सुदर्शनच पाहिजे.

Leave a Comment