गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस – तरेल की बुडेल?


कर्नाटक हे काँग्रेसच्या खात्यात असलेले मोठे राज्य. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत काँग्रेसकडे असलेले हे एकमेव मोठे राज्य होते. मात्र आता हे राज्य काँग्रेसकडून जाण्याच्या बेतात असून सरकार पडल्याची घोषणा कधीही होऊ शकते. मात्र राज्यात हे राजकीय नाट्य घडत असताना दिल्लीत वेगळाच घटनाक्रम होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या मागोमाग अन्य नेत्यांनीही तोच मार्ग धरला आहे.

आता राहुल यांनी राजीनामा तर दिला आहेच, शिवाय गांधी कुटुंबियांपैकी कोणीही पक्षाचे नेतृत्व करता कामा नये, अशी अटही टाकली आहे. त्यामुळे काँग्रेसजनांना आपले भविष्य अंधकारमय असल्याचे वाटल्यास नवल नाही.

काँग्रेसच्या कार्यप्रणालीची ओळख असणाऱ्या सर्व निरीक्षकांना ही गोष्ट पक्केपणी माहीत आहे, की काँग्रेसने अनेक दशके नेहरू-गांधी कुटुंबाशिवाच्या जीवनाची कल्पनाही केलेली नव्हती. जून 1991 मध्ये ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली तेव्हा काँग्रेसला पहिला धक्का बसला होता. त्यानंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाही पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात काँग्रेस कमजोर होत गेली. एकवेळ तर काँग्रेसमध्ये फूटही पडली आणि जी. के. मूपनार व पी. चिदंबरम यांच्या सारख्या नेत्यांनी तमिळनाडूत आपला सवतासुभा उभा केला. या दोन नेत्यांनी तमिळ मानिला काँग्रेस नावाचा पक्ष काढून निवडणूक लढविली.

राव यांच्या नंतर सीताराम केसरी हे पक्षाचे अध्यक्ष बनले मात्र त्यांच्या काळात काँग्रेस आणखी गलितगात्र झाली. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. ही दुर्दशा पाहून सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी अत्यंत अपमानास्पद रीतीने केसरी यांना काँग्रेस कार्यालयातून बाहेर काढले होते. सोनियांनी 1997-98 साली राजकारणात उडी घेतली आणि काँग्रेसला संजीवनी मिळाली. तेव्हापासून काँग्रेसची सूत्रे पुन्हा गांधी कुटुंबियांच्या हातात आहेत. सोनियांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 2004 आणि 2009 साली यश मिळाले मात्र 2014 आणि 2019 मध्ये राहुल यांना तो प्रभाव दाखवता आलेला नाही. तरीही गांधी कुटुंबाशिवाय पक्ष चालेल यावर काँग्रेसजनांचा विश्वास नाही.

म्हणूनच “काँग्रेस अध्यक्षपदी कोणीही विराजमान व्हावे, गांधी कुटुंबाने पक्षात सक्रिय राहणे आवश्यक आहे,” असे वक्तव्य काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले होते.

काँग्रेसच्या दृष्टीने सध्याचा काळ पूर्वी कधीही नव्हता एवढा कठीण आहे, हे नक्की कारण काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशात पसरला आहे. शिवाय भाजपचे नेतृत्वही पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आक्रमक आहे. काँग्रेस ऐन भरात असताना सुद्धा विरोधी पक्षांकडे जयप्रकाश नारायण, राज नारायण, चंद्रशेखर, जगजीवन राम, ज्योति बसू किंवा जॉर्ड फर्नांडिस यांच्यासारखे दिग्गज नेते होते. आज तीही स्थिती नाही आणि एक प्रकारे भाजपला मोकळे रान मिळाले आहे.

ही परिस्थिती निर्माण व्हायला खरे म्हणजे काँग्रेसच कारणीभूत आहे. कारण काँग्रेसने राज्यांराज्यांमध्ये मोठे नेते निर्माणच होऊ दिले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या काळात जनाधार नसलेल्या दरबारी नेत्यांना महत्त्व देण्यात आले. त्यामुळे त्या-त्या राज्यांत मोठे नेते घडू शकले नाहीत. शिवाय अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना काँग्रेसने प्रोत्साहन दिले. उदाहरणार्थ महाराष्ट्रात शिवसेनेला एकेकाळी काँग्रेसनेच मोठे केल्याचे उघडपणे सांगितले जाते. शिवसेनेला अनेक वर्षे वसंत सेना म्हणजे वसंतराव नाईक यांची सेना असे चेष्टेने म्हटले जात असे ते याचसाठी.

आता आज काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ पडला आहे. सर्व दरबारी नेते राहुल गांधींना नेतृत्व करा म्हणून गळ घालत आहेत आणि राहुल मात्र ‘मी अध्यक्ष नाही’ म्हणून हात वर करत आहेत. हे दृश्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजिबात उपयोगी पडणारे नाही. शिवाय आपल्या पाच राज्यांतील सरकारांना वाचविण्याचेही काम काँग्रेसला करायचे आहे. या सरकारांचा घास घेण्यास भाजप टपून बसला आहेच. त्यातील कर्नाटकातील सरकार तर गेल्यात जमा आहेच. फक्त ते आज जाते की उद्या, एवढाच प्रश्न आहे.

ही सगळी परिस्थिती असताना काँग्रेसमध्ये काय चालू आहे? तर राजीनाम्याचे सत्र. राहुल यांचे विश्वासू ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसचे प्रमुख म्हणून राजीनामा दिला आहे. आतापर्यंत जवळपास 200 काँग्रेस नेत्यांनी आपापले राजीनामे देऊ केले आहेत.

या सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो, की गांधी कुटुंबाशिवाय आपण जगू शकतो हा विश्वासच काँग्रेसजनांच्या मनात उरला नाही. राहुल गांधी म्हणतात तसे गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीने काँग्रेसचे नेतृत्व केले आणि पक्षाला यश मिळाले तरच हा विश्वास परत येऊ शकतो. अन्यथा नाही.

Leave a Comment