असा संपवावा विरोधी पक्ष – आंध्रात भाजपचे प्रात्यक्षिक


कर्नाटकात एकीकडे धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेसच्या 13 आमदारांनी राजीनामा देऊन राजकीय भूकंप केला. दुसरीकडे शेजारच्या आंध्र प्रदेशातही भारतीय जनता पक्षाने राजकीय भूकंप करण्याची पूर्ण तयारी केली आहे. राज्यातील माजी सत्ताधारी असलेल्या तेलुगु देसम पक्षाचे 18 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आंध्र प्रदेशाचे प्रभारी सुनील देवधर यांनी केले आहे. त्रिपुरात साम्यवादी पक्षाची दोन दशकांची राजवट उलथवून तेथे भाजपची सत्ता आणण्याचे अशक्यप्राय वाटणारे कार्य याच देवधर यांनी तडीस नेले होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

आंध्र प्रदेशात लवकरच राजकीय भूकंप होईल, असे देवधर यांनी म्हटले आहे. आता ज्या पक्षाचे विधानसभेत 23 आमदार आहेत त्या पक्षाचे 18 आमदार एका झटक्यात फोडणे हा भूकंपच आहे. तो पक्ष जागच्या जागी संपून जाण्याचेच ते चिन्ह आहे. एवढेच नव्हे तर आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू येत्या दोन वर्षात तुरुंगात जातील, असेही त्यांनी जाहीर केले आहे. नायडू तुरुंगात गेल्यानंतर भाजप हा आंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

चंद्राबाबू नायडू हे भ्रष्टाचारात गळ्यापर्यंत बुडालेले असून त्यांना लवकरच तुरुंगवारी घडेल हे तेलुगु देसम पक्षाच्या नेत्यांना पुरते ठाऊक आहे. चंद्राबाबू यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांचे मित्र व नातेवाईकही भ्रष्टाचारात बुडालेले आहेत, असे देवधर यांनी म्हटले आहे.

आंध्र प्रदेशात नुकत्याच लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात वायएसआर काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आणि जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर रेड्डी यांनी चंद्राबाबू यांच्यावर कारवाई करण्याचा सपाटा लावला. त्यांनी आधी चंद्राबाबू यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्या निवासस्थानावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारचा हा ससेमिरा चालू असतानाच भाजपही चंद्राबाबू यांच्या हात धुऊन मागे लागला आहे. शिवाय जगनमोहन आणि भाजपमध्ये मैत्रीचे संबंध असल्यामुळे नायडूंच्या अडचणीत वाढच झाली आहे.

गेल्या महिन्यात नायडू हे परदेशात असताना भाजपने त्याच्या राज्यसभेतील खासदारांची शिकार केली. राज्यसभेतील तेलुगु देसमच्या सहापैकी चार खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्यावरील खटले लांबवण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठीच त्यांनी हे पक्षांतर केल्याची चर्चा होती. एवढ्यावर न थांबता भाजपने आपला संघटनात्मक विस्तार करण्याचे कामही गांभीर्याने सुरू केले आहे. भाजप आपल्या सर्वात मोठ्या सदस्यत्व मोहिमेपैकी एक मोहीम आंध्र प्रदेशात राबवणार आहे. त्यातही ही मोहीम प्रत्येक जिल्ह्यातील दलित वस्त्यांमधून सुरू करण्यात येणार आहे.

म्हणूनच निवडणुकीला तीन महीने झाले तरी पराभवांच्या कारणांचा शोध लागत नसल्याचे हताश उद्गार नुकतेच नायडूंनी काढले. तब्बल 14 वर्षे मुख्यमंत्री, 10 वर्षे विरोधी पक्षाचा नेता आणि 20 वर्षे तेलुगु देसम पक्षाचा अध्यक्ष म्हणून अनुभव असतानाही या निकालांवर विश्वास बसत नाही. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि महिलाही हे निकाल पचवू शकत नाहीत, असे त्यांनी खम्मम येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची प्रत्येक चाल चुकीची पडत गेली आहे. गेल्या वर्षी तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. मात्र निवडणुकीत दोन्ही पक्षांचे पानिपत झाले. त्यानंतर लोकसभेतही त्यांनी काँग्रेसशी जवळीक केली. मात्र आंध्र प्रदेशात राज्याच्या विभाजनासाठी काँग्रेसला खलनायक मानण्यात येते. त्यामुळे त्या नाराजीचा फटका तेलुगु देसमला बसला.

नायडू यांचा पराभव पहिल्यांदाच झाला आहे, असे नाही. यापूर्वी 2004 आणि 2009 मध्येही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यावेळी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेतृत्व विरोधकांना संपविण्याचा विचार करत नव्हते. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. नायडू यांनी रालोआची साथ तर सोडलीच, वर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकेची धार धरली आणि विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्याचाच बदला जणू आता भाजप घेत आहे. एक प्रकारे विरोधी पक्षाला कसे संपवावे याचे प्रात्यक्षिकच भाजप आंध्र प्रदेशात घडवत आहे, असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही.

Leave a Comment