केवळ युवराजमुळेच विश्वचषकात भरीव कामगिरी करुन शकलो


नवी दिल्ली – टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सध्या तुफान फॉर्ममध्ये असून रोहित सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये अव्वल स्थानावर आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने पाच शतके झळकावत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्माने या सर्वांचे श्रेय भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला दिले आहे. विश्वचषकात युवराजच्या मार्गदर्शनामुळे सातत्याने धावा करू शकलो असे रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले.

आयपीएलमध्ये माझा सूर काहीसा हरवला होता. युवराज सिंगने त्या वेळी मला मोलाचे मार्गदर्शन करून गरजेच्या वेळी तूच भारतासाठी धावा करशील, असे सांगितल्यामुळे माझा आत्मविश्वास बळावला व विश्वचषकात मी सातत्याने धावा करू लागलो, अशी प्रतिक्रिया भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली.

आम्ही दोघांनी संपूर्ण ‘आयपीएल’मध्ये एकमेकांच्या कामगिरीविषयी चर्चा केली. युवराज माझ्या थोरल्या भावासारखा असल्यामुळे खेळाव्यतिरिक्त अन्य खासगी गोष्टींविषयीसुद्धा आम्ही चर्चा करतो. ‘आयपीएल’दरम्यान मला चांगली सुरुवात मिळत होती, पण अर्धशतक झळकावता येत नसल्यामुळे मला युवराजने सांगितले की, जेव्हा भारताला सर्वाधिक गरज असेल त्या वेळी तू नक्कीच धावा करशील, असे रोहित म्हणाला.
आयसीसीच्या क्रमवारीत विराट ‘नंबर वन’ तर रोहित शर्मा ‘नंबर दोन’वर

टीम इंडियाचे फलंदाज यंदाच्या विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतला नंबर वन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कायम राखला आहे. तर विश्वचषकातील कामगिरीमुळे उपकर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या क्रमांकावर स्थानावर मजल मारली आहे.

रोहित शर्माने विश्वचषकातील कामगिरीमुळे 51गुणांची पिछाडी अवघ्या सहा गुणांवर आणून ठेवली आहे. एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर असून, 885 रेटिंग गुण त्याच्या खात्यात आहेत. विश्वचषकात पाच अर्धशतकांसह 442 धावांचा रतीब विराटने घातला आहे. या कामगिरीने त्याच्या खात्यात केवळ एका रेटिंग गुणाची भर घातली आहे. आयसीसीच्या क्रमवारीत विराट 891 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 827 गुण आहेत.

टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माला विश्वचषकात त्याच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम फॉर्म गवसला आहे. टीम इंडियाच्या यशात रोहितची ही वैयक्तिक कामगिरी त्याचे पहिले योगदान आहे. रोहितने या विश्वचषकात आतापर्यंत पाचवं शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे एकाच विश्वचषकात सर्वाधिक पाच शतकं झळकावण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.

विश्वचषक स्पर्धेतील 44 व्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध मोठा विजय मिळविला. सामन्यात उपकर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतक झळकावले. रोहितने विश्वचषक स्पर्धेत 5 शतक झळकावण्याचा विश्वविक्रम केला असून त्याने अनेक कल्पित गोष्टी मागे सोडल्या आहेत. आपला कारकिर्दीतील दुसरा विश्वचषक खेळत असलेल्या हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने या विश्वचषकात अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्काराचा विक्रम ही त्यापैकीच एक आहे. श्रीलंकेविरूद्ध झळकवलेल्या शतकामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विश्वचषक इतिहासातील त्याचा हा पाचवा पुरस्कार ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा विक्रम भारतीय महान खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या नावे आहे. सचिनने 44 डावांमध्ये 9 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे.

Leave a Comment