कधी संपणार कर्नाटकातील नाटक?


कर्नाटकातील आता जाईल-मग जाईल असे म्हटले जाणारे धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीयू)-काँग्रेस युती सरकार पुन्हा एका नव्या संकटाला सामोरे जात आहे. आधीच कसेबसे चालत असलेली सरकारची ही नौका आणखी एका खडकावर आदळली आहे. शनिवारी जेडीयू- काँग्रेसच्या तब्बल 14 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे सरकारवर पुन्हा संकट आले आहे. आता हे नाटक कधी संपणार हे काळ तरी सांगू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या 11 आमदारांमध्ये 8 जण काँग्रेसच तर 3 जण जेडीएसचे आहेत. या सर्वांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देऊ केल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ राजीनामा देऊनच ते थांबले नाही तर त्यांनी आपले मोबाईल फोनही बंद केल्याचेही म्हटले जाते. ‘‘काँग्रेस आणि जेडीयूच्या 14 आमदारांनी राजीनामा दिला आहे. यांमध्ये आनंद सिंह यांचाही समावेश आहे…आम्ही राज्यपालांनाही या घटनेही माहिती दिली आहे,’’ असे जेडीएसचे आमदार ए एच विश्वनाथ यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना भेटल्यावर सांगितले.

आता त्यात आणखी एक गंमतीशीर वळण आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री झाले तर आपण आपला राजीनामा परत घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारवर दीर्घकाळापासून घोंघावत असलेले वादळ आणखी गहिरे झाले आहे. कर्नाटक विधानसभेत एकूण 225 आमदार असून त्यातील 105 आमदार भाजपचे असून काँग्रेसचे 79, जेडीएसचा 38 आणि बहुजन समाज पक्षाचा एक आमदार आहे.

तसे पाहिले तर हे युतीचे सरकार आल्यापासूनच नाट्यमय घटना घडल्या आहेत. मग ते मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी सार्वजनिकरीत्या अश्रू गाळणे असो किंवा सिद्धरामय्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालणे असो. मात्र सध्याच्या घटनांनी आधीच्या सर्व घटनांना मागे टाकले आहे.

आधी तर विधानसभा अध्यक्ष आपल्या दालनात नसल्याने या आमदारांनी त्यांचे राजीनामे अध्यक्षांच्या सचिवांकडे सुपूर्द केले. त्यानंतर योग्य वेळी या राजीनाम्यांवर निर्णय घेऊ, असे अध्यक्षांनी जाहीर केले. त्यानंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले तर आम्ही आमचा राजीनामा मागे घेऊ, असे या बंडखोरांपैकी चार जणांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नते डी. के. शिवकुमार हे या आमदारांची समजूत घालण्याच्या मागे लागले आहेत. शिवकुमार यांनी तर काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्याची प्रत फाडून धडाकेबाज कृती केली. यूपीए सरकारचा अध्यादेश फाडणारे आपले नेते राहुल गांधी यांचेच त्यांनी अनुकरण केले.

हा प्रकार सुरू असतानाच सिद्धरामय्या यांनी कर्नाटकाची सरकार स्थिर असल्याची ग्वाही दिली आहे तर कुमारस्वामी अजूनही अमेरिकेत असून ते आपला दौरा अर्धवट टाकून रविवारी परत येतील, अशी अपेक्षा आहे.

या दरम्यान आपले मोठ्या राज्यातील एकमेव सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसनेही पूर्ण शक्ती लावली आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि कर्नाटकाचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी सोपविली आहे. वेणुगोपाल यांनी सिद्धरामय्या यांच्यासह शिवकुमार आणि प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खांद्रे यांच्याशी सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा सुरू केली आहे. नि या सर्वांवर कडी म्हणजे कुमारस्वामी यांचे पिताश्री व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मी काही बोलणारच नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

या सर्व परिस्थितीत शिंक्याखाली मांजर थांबावे तसा भारतीय जनता पक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या आमदारांच्या राजीनाम्यांशी आमचे काहीही देणे-घेणे नाही असे भाजपने स्पष्ट केले आहे. आम्ही योग्य वेळी निर्णय करू, अशे राज्य भाजपचे प्रमुख बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले तर हे राजीनामे सिद्धरामय्या यांच्यामुळे पडल्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारे दोन्ही-तिन्ही बाजूंनी वक्तव्ये आणि प्रतिक्रियांचा मारा होत आहे. मात्र राज्यातील जनतेला त्यांचे हाल विचारणारे कोणीही नाही. त्यामुळे एकदाचे हे नाटक संपावे आणि सत्तेचा सोक्षमोक्ष लागावा, अशीच तेथील जनतेची इच्छा असणार. ही इच्छा लवकरच पूर्ण होईल, अशी चिन्हे आता दिसत आहेत.

Leave a Comment