रंगील्या शहराचा सार्थ गौरव!


गगनचुंबी किल्ले, सोनरी-पिवळ्या आणि रंग-बिरंगी पगड्या, मनमोहक बोलणं, गोड लोकगीते आणि चालरितींची मर्यादा ही राजस्थानची ओळख आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत संस्कृती कशी विकसित करावी, याचा वस्तुपाठच राजस्थानने अनेक शतकांपासून या देशाला घालून दिला आहे. रंगीलो राजस्थान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानची ख्याती पराक्रम, औदार्य आणि शौर्य यांबद्दल सर्वत्र पसरलेली आहे. तशीच त्या राज्यातील वास्तुकलाही जगात आपली एक ओळख बाळगून आहे.

या वास्तुकलेचा मेरूमणी शोभावा तर ते जयपूर शहरातच. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या राजस्थान राज्याची जयपूर ही राजधानी आहे. विविध महालांसाठी तर जयपूर शहर प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक शहराला भेट देण्यासाठी येत असतात. जयपूर शहरातील बहुतेक ऐतिहासिक इमारती गुलाबी रंगाच्या आहेत आणि म्हणूनच गुलाबी शहर अशी त्याची ओळख आहे. अशा या रंगीबेरंगी शहराची दखल‘युनेस्को’नेही घेतली असून या शहराचा समावेश त्या संघटनेने जागतिक वारसा यादीत केला आहे. एका गुलाबी शहराला मिळालेली ही सार्थ जागतिक दाद आहे. जयपूरचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

येथील बहुतांश इमारतींचा दर्शनी भाग सुंदर गुलाबी रंगाचा असतो. यामुळे पाहणाऱ्याचे मन एकदम प्रसन्न होऊन जाते. विशेष म्हणजे जयपूर नगरीचे हे वैशिष्ट्य कायम रहावे म्हणून येथील नगरपालिका सदैव दक्ष असते. भोवतीच्या टेकड्यांवरील किल्ले आणि मनोरे यांमुळे नगरीच्या मध्ययुगीन वातावरणात भरच पडते.

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीची 43 वी बैठक गेल्या 30 जूनपासून अझरबैजानमधील बाकू शहरात सुरु असून ती 10 जुलैपर्यंत चालणार आहे. त्या बैठकीत जयपूर शहराचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले. जयपूरचा या यादीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या महिन्यात मांडण्यात आला होता. जयपूर शहरास हा दर्जा प्रदान करण्याआधी संबंधित समितीने 2018 साली या शहरास भेट देऊन पाहणी केली होती. बाकू येथील बैठकीय जयपूर शहराच्या अर्जावर विचार करण्यात येऊन त्यास जागतिक वारसा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतामध्ये ज्यांना जागतिक वारसा मिळालेला आहे अशी 37 ठिकाणे आहेत. त्यातील 28 जागांना सांस्कृतिक तर सात ठिकाणांना नैसर्गिक महत्त्व आहे तर एका स्थानाचे महत्त्व संमिश्र आहे. सर्वाधिक जागतिक वारसा प्राप्त झालेल्या देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो.

जयपूर शहराची उभारणी महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी 1727 मध्ये केली होती. महाराजा सवाई जयसिंग दुसरा याने कल्पकतेने1728मध्ये ही नगरी वसविली आणि सु. 11किमीवरील अंबेरहून राजधानी येथे आणली. या राजाच्या नावावरूनच नगरीस जयपूर हे नाव मिळाले. येथील जुना राजवाडा हा दोनशे वर्षांपूर्वीचा मोगल-राजपूत शिल्पाचा उत्तम नमुना आहे. पाच मजली चंद्रमहाल व कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेला मुबारक महाल, वास्तुकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रतापसिंहाने बांधलेला हवामहल, जुने लेख, चित्रे, शस्त्रे यांचासंग्रह, जंतरमंतर ही उघड्यावरील वेधशाळा, सार्वजनिक उद्यान व तेथील प्राणिसंग्रहालय, नाहरगढ टेकडीजवळच्या पूर्वीच्या महाराजांच्या छत्र्या, टेकडीवरील सूर्यमंदिर, गोविंदजीचे मंदिर इ. ठिकाणे पाहण्यासाठी प्रवाशांची रीघ असते.

या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भारतातील कदाचित एकमेव ममी या जयपूर शहरात आहे. येथील अल्बर्ट हॉलमध्ये सुमारे 2500 वर्षे जुना मृतदेह (ममी) आजही जपलेला असून तो पर्यटकांचा आकर्षण ठरला आहे. एका महिलेचे हे पार्थिव असून या मृतदेहाला जडीबुटी लावून त्याचे जतन करण्यात आले आहे. त्यामुळे आजही हे हे पार्थिव 2500 वर्षांपूर्वीच्या अवस्थेत पाहायला मिळते. तूतू नावाच्या महिलेची ही ममी असून खेम नावाच्या देवाची आराधना करणार्‍या पुरोहित कुटुंबातील ही महिला होती. मृत्यु झाला तेव्हा या महिलेचे वय 50 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. इजिप्तमधील प्राचीन नगर पॅनोपोलिसमधील अखमीन भागातून हे पार्थिव आणले आहे.

अशा अनेक चित्र-विचित्र गमती आपल्या पोटात सामावलेल्या जयपूर शहराला आता जागतिक पातळीवर अधिकृत स्थान मिळाले आहे. जयपूरला भारताचे पॅरिस असेही म्हणतात. अशा या रंगील्या व रंगेल शहराचा सार्थ गौरव झाला आहे. संपूर्ण भारतवासीयांना अभिमान वाटावी अशीच ही घटना आहे.

Leave a Comment