कमी बजेटमधील या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली भरमसाट कमाई


बॉलीवूडमधील चित्रपट म्हटले, की परदेशी लोकेशन्स, खास चित्रपटासाठी लाखो रुपये खर्च करून तयार करविण्यात आलेले पोशाख, महागड्या गाड्या आणि अर्थातच कलाकारांचे मानधन या सर्व गोष्टी विचारात घेता, आजकालच्या चित्रपटांचे बजेट लाखोंमध्ये नसून, कोट्यवधींमध्ये गेले आहे. इतके करूनही सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करू शकतातच असे नाही. अगदी महागड्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ पडतात, तर काही अतिशय माफक बजेटमध्ये बनविले गेलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करतात. अलीकडच्या काळामध्ये असे काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांच्यासाठी बजेट अगदी कमी होते, मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगलेच यशस्वी ठरले. त्यावरूनच, उत्तम चित्रपट बनविण्यासाठी महागड्या बजेटची आवश्यकता नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘स्त्री’ या थरारपटाने प्रेक्षकांची पसंती मिळविली. या चित्रपटाचे एकूण बजेट २३ ते २४ कोटींच्या दरम्यान होते, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करीत १८० कोटींचा पल्ला गाठला. या थरारपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांचे असून चित्रपटामध्ये अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘बधाई हो’ ने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. हा चित्रपट बनविण्यासाठी २९ कोटी रुपयांचा खर्च आला असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २२१ कोटींपर्यंत मजल मारली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर शर्मा यांनी केले असून, यामध्ये सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, सुरेखा सिक्री, गजराज राव या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आयुष्मान खुराना आणि तबूच्या प्रमुख भूमिका असणारा ‘अंधाधुन’ हा चित्रपट पुण्यामध्ये चित्रित झाला असून, हा चित्रपट बनविण्यासाठी ३२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने विक्रमी ४४१ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला चीनमध्येही खूप लोकप्रियता लाभली. चीनमध्ये या चित्रपटाने ३३५ कोटींची कमाई केली. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने कमाईचे सर्वच विक्रम पार केले. आलिया भट्ट आणि विकी कौशल अभिनीत ‘राजी’ या चित्रपटाचे एकूण बजेट चाळीस कोटींचे होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०७ कोटींची कमाई केली. या चित्रपटामध्ये आलियाने गुप्तहेराची भूमिका साकारली असून, विकी कौशल याने पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांचे आहे.

सोहम शाह अभिनीत ‘तुंबाड’ या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. केवळ पाच कोटी रुपये खर्चामध्ये बनविण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तेरा कोटी रुपये कमाविले असले, तरी या चित्रपटाला दर्शकांनी खूप पसंत केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल यांचे होते.

Leave a Comment