नीरव मोदीला 7, 300 कोटी रुपये व्याजसहित जमा करण्याचे आदेश


पुणे – पुण्याच्या कर्जवसुली न्यायाधिकरणाने पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी हिरा व्यापारी नीरव मोदीला दणका दिला आहे. नीरव मोदीला 2 वेगवेगळ्या दाव्यांमध्ये व्याजासहित ७ हजार ३०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायाधीश दीपक ठक्कर यांनी दिले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेने मुंबई येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणामध्ये नीरव मोदी याच्या विरुद्ध तीन वेगवेगळे दावे दाखल केले होते. पण, मुंबई येथील न्यायाधीशांची जागा सध्या रिक्त असल्यामुळे पुण्याच्या न्यायाधिकारणामध्ये या दाव्याची सुनावणी पार पाडण्यात आली. त्यानंतर १२ जूनला दोन दाव्यांची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी नीरव मोदीच्या वतीने न्यायालयात कोणीही हजर नव्हते.

दरम्यान, आज दोन्ही दाव्यांमध्ये पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधिकरणाने पंजाब नॅशनल बँकेची मागणी मान्य केली आहे. नीरव मोदीला पहिल्या दाव्यामध्ये ७०२९ कोटी आणि दुसऱ्या दाव्यामध्ये २३२.१५ कोटी रुपये व्याजासहित जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई कर्जवसुली न्यायाधिकरणाचे वसुली अधिकारी नीरव मोदीकडून ही रक्कम वसूल करणार आहेत.

Leave a Comment