
लंडन – भारतीय संघ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात भगव्या जर्सीत उतरला होता. अजेय असलेल्या भारतीय संघाला त्या सामन्यात ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचे खापर ट्रोलर्सनी भगव्या जर्सीवर फोडले. दरम्यान, भगव्या जर्सीमध्ये पुन्हा भारतीय संघ खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
पुन्हा एकदा ‘भगव्या’ जर्सीमध्ये मैदानात उतरु शकते टीम इंडिया
बांगलादेशचा २८ धावांनी पराभव करत भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केल्यानंतर न्यूझीलंडचा पराभव करत यजमान इंग्लंडनेही उपांत्य फेरी गाठली. पहिले तीन संघ ऑस्ट्रेलिया, भारत, आणि इंग्लड असे ठरु शकतात. तर चौथा संघ नेट रनरेटच्या आधारावर न्यूझीलंड ठरु शकतो. जर असे झाल्यास भारतीय संघाचा उपांत्य सामना इंग्लडशी होईल. मागील सामन्याप्रमाणे भारतीय संघाला भगव्या जर्सीमध्ये मैदानात उतरावे लागेल.
‘होम आणि अवे’ संकल्पनेचा स्वीकार आयसीसीने केला आहे. यानुसार दोन संघ एकाच रंगाची जर्सी एकाच सामन्यात घालू शकत नाहीत. एका संघाच्या जर्सीमध्ये त्याकारणाने बदल केला जातो. स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडचा संघ करत असल्याने भारतीय संघाची जर्सीमध्ये बदल करण्यात आला. दरम्यान, ही जर्सीमधील बदलाची संकल्पना फुटबॉल खेळातून घेण्यात आली आहे. भारतीय संघ गुणातालिकेत दोन नंबरवर राहिला आणि इंग्लंडचा संघ जर तीन नंबरवर कायम राहिला तर भारतीय संघ उपांत्य सामन्यात साहेबांशी ‘भगव्या’ रंगात भिडणार आहे.
