सोलापूर – राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेशी निगडीत ठेकेदार तिवरे धरणफुटीला जबाबदार नसल्याचे म्हणत धरण परिसरात असलेल्या खेकड्यांचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे धरण फुटल्याचा जावईशोध लावला आहे.
राज्याच्या जलसंधारण मंत्र्याचा जावईशोध; तिवरे धरण खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळेच फुटले
जलसंपदा विभागाच्या आष्टी उपसिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरे आले होते. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत देखील त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी हे अजब वक्तव्य त्यावेळी केले. रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे धरण फुटले. त्याला जबाबदार कोण? असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे. तसेच हे धरण शिवसेनेच्या आमदाराने बांधले आहे. याप्रकरणी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. तसेच निकृष्ट बांधकामाची चौकशी करून कडक कारवाई करण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. महाजनांचा रोख शिवसेनेकडे होता काय? असा प्रश्न सावंत यांना विचारला होता. त्यावर त्यांनी हे अजब उत्तर दिले. पुण्यातील मुठा कालवा गेल्या वर्षी २८ सप्टेंबरला फुटला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावेळी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटला, असे अजब वक्तव्य केले होते.