सरफराजची अतिशयोक्ती; म्हणे बांग्लादेश विरोधात ५०० धावा करू आणि ५० धावात बाद करू


नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवणे पाकिस्तान संघासाठी केवळ आता गणिताचे कोडे बनले असून पाकिस्तानला आज विश्वचषक स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवावा लागणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्रवारी चमत्कार होईल असा विश्वास पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमदने व्यक्त केला आहे.

पाकिस्तानच्या संघाचा गेल्या सलग चार सामन्यात बांग्लादेशने पराभव केला असून त्यानंतर आता पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज म्हणाला की, प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी सर्वस्वी पणाला लावू. अल्लाहच्या मनात जर असेल तर चमत्कार होईल. ते असे आहे की ६००, ५००, ४०० धावा करून त्याच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला ५० धावांत बाद केल्यानंतरच ३१६ धावांच्या फरकाने विजय मिळवता येईल. तुम्हाला जर हे शक्य वाटत असेल तर आम्ही प्रयत्न करायला तयार आहे. असा विश्वास सरफराजने व्यक्त केला.

आम्ही बांग्लादेशविरोधात नाणेफेक जिंकून ५०० धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू. आम्ही विंडीजविरोधात धावगती वाढवू शकलो नाही. नेटरनरेट खूप जास्त आहे. पण आम्ही बांग्लादेशविरोधात ५०० धावा करण्याचा प्रयत्न करू. आम्ही उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. जर आमच्या नशीबात चमत्कार लिहला असेल तर शुक्रवारी नक्कीच तो होईल, असे सरफराज म्हणाला.

Leave a Comment