पंचांशी हुज्जत घालणे कोहलीला पडू शकते महागात


नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर मात करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भारतासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान असण्याची शक्यता आहे. पण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्या सामन्याआधीच अडचणीत येण्याची शक्यता आहे. विराटने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदानातील पंचांशी हुज्जत घातली. त्याच्या या वागण्यामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

सौम्या सरकार १२ व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पायचीत असल्याचे अपील करण्यात आले. भारतीयांचे हे अपील मैदानावरील पंच मॅरिअर इरास्मस यांनी फेटाळून लावले. याविरोधात तिसऱ्या पंचांकडे भारताने दाद मागितली. तिसऱ्या पंचांच्या पाहणीमध्ये शमीचा चेंडू बॅट आणि पॅडला एकाचवेळी लागल्याचे दिसते होते. तिसऱ्या पंचांनी या कारणामुळे भारतीयांचे अपील फेटाळून लावले. पण तिसऱ्या पंचाचा हा निर्णय विराट कोहलीला मान्य नव्हता, म्हणून पंच मॅरिअस इरास्मस यांच्याशी विराटने हुज्जत घातली.

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातही वाजवीपेक्षा जास्त अपील केल्यामुळे त्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. विराटने आयसीसीच्या कलम 2.1 Subsection of Level 1 या नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या नियमांचा भंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूकडून झाल्यास त्याला नकारात्मक गुण दिले जातात. जर एका खेळाडूने दोन वर्षांच्या कालावधीत ४ किंवा त्यापेक्षा जास्त नकारात्मक गुण कमावले तर त्याच्यावर आयसीसीच्या नियमांप्रमाणे बंदीची कारवाई करण्यात येते. १ कसोटी सामना किंवा २ एकदिवसीय किंवा २ टी-२० सामन्यांसाठी बंदीची शिक्षा ही दिली जाऊ शकते.

Leave a Comment