इंटरनेट हा आधुनिक जीवनाचा परवलीचा शब्द आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या आगमनामुळे इंटरनेट हे प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनले आहे. मात्र यामुळेच काही मोजक्या कंपन्या बलाढ्य बनल्या असून त्यांच्या हातात कोट्यवधी व्यक्तींची गोपनीय व खासगी माहिती एकवटली आहे. या माहितीचा गैरवापर या कंपन्या करतात आणि त्यातून आपले व्यापारी जाळे अधिक पसरवतात. केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीच्या निमित्ताने दीड-दोन वर्षांपूर्वी हा गैरव्यवहार बाहेर आला होता. त्या प्रकरणात फेसबुकवर चौफेर टीका झाली होती, मात्र फेसबुकसोबतच ट्विटर आणि गुगलसारख्या कंपन्याही यात तेवढ्याच गुंतलेल्या आहेत. सर्वसामान्य माणूस त्यांच्या विरोधात फारसे काही करू शकत नसला, तरी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील जाणकार त्यांचा भंडाफोड करायला पुढे येतात, ही समाधान बाब देणारी बाब आहे.
आमचे इंटरनेट आम्हाला परत द्या!
विकिपीडियाचा सहसंस्थापक लॅरी सेंगर ही अशीच एक व्यक्ती. इंटरनेट हे मोजक्या कंपन्यांच्या हातातून काढून घेऊन त्याचे विकेंद्रीकरण करावे, अशी मागणी सेंगर याने केली आहे. अमेरिकेच्या जाहिरनाम्याप्रमाणेच दिसणारा एक लांबलचक दस्तऐवज सेंगर याने स्वतःच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. योगायोग म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवसांआधी म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात त्याने म्हटले आहे, की इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला “मूलभूत डिजिटल अधिकार” आहेत आणि त्यांची जपणूक झाली पाहिजे. मुक्त भाषण, गोपनीयता आणि सुरक्षितता यांचा त्या अधिकारांत समावेश आहे.
विशाल डिजिटल साम्राज्य असलेल्या कंपन्या या अधिकारांचे अनधिकृतपणे उल्लंघन करत असून त्या स्वतःच्या नफ्यासाठी मानवतेचे शोषण करीत आहेत. या लोभी कंपन्यांकडून होणाऱ्या सामान्य इंटरनेट वापरकर्त्यांच्या शोषणाची एक लांबलचक यादीच त्याने प्रसिद्ध केली आहे. यात मालकांच्या सुस्पष्ट संमतीशिवाय खाजगी डेटा घेण्यापासून तो जाहिरातदारांना विकण्यापर्यंत आणि सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी सरकारला मदत करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांच्या प्रमाणेच गुगलकडेही लोकांचा मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक देशांच्या माहितीवर गुगलचे नियंत्रण आहे, असे म्हणता येईल. गुगल किंवा अन्य कंपन्यांचे माहितीवरील नियंत्रण किंवा एकाधिकार कमी होईल अशी एखादी आंतरराष्ट्रीय प्रणाली विकसित व्हायला हवी, असे भारतासह इतर अनेक देशांनी वारंवार म्हटले आहे. मात्र अजूनही ही मागणी वास्तवात आलेली नाही.
सेंगर हा विकिपीडियाचा संस्थापक आहे. जिमी वेल्स याच्या बरोबरीने त्याने 15 जानेवारी 2001 मध्ये विकिपीडियाची स्थापना केली होती आणि प्रोजेक्टचा कम्युनिटी लीडर म्हणून त्याने कामही केले होते. मात्र त्यानंतर एक वर्षानंतर त्याने विकिपीडियाला रामराम केला होता. आमच्या गोपनीयतेची, सुरक्षिततेची आणि मुक्त भाषणाची सर्वात विश्वसनीय हमी ही कोणत्याही उद्योग, संस्था किंवा शासनाच्या हातात नाही, तर स्वतंत्र लोकांच्या मुक्त सहमतीमध्ये आहे असे त्याचे म्हणणे आहे.
सेंगर केवळ आवाहन करून थांबला नाही. तर त्याने 4 आणि 5 जुलै हे दिवस “सोशल मिडिया स्ट्राईक” दिवस म्हणून साजरे करायचे आव्हान केले आहे. या दोन दिवशी वापरकर्त्यांनी केवळ आपण “संपावर” असल्याच्या पोस्ट वगळता अन्य कोणत्याही पोस्ट करू नयेत, अशी त्याची कल्पना आहे.
गंमत सेंगर हे आवाहन करत असताना एकेकाळी त्यानेच निर्माण केलेल्या विकिपीडियामध्येही हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश आहे आणि कोणीही त्याचे संपादन करू शकतो. त्यामुळे खुल्या इंटरनेटच्या शेवटच्या बुरुजांपैकी तो एक आहे, असे मानले जाते. मात्र या विकिपीडियातही संपादकांचा एक मजबूत समुदाय आहे आणि तो अत्यंत सक्रिय आहे. या संपादकांपैकी एका विकिपीडिया प्रशासकाला नुकतीच एका वर्षासाठी वेबसाइटच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादन करण्यास मनाई करण्यात आली. विकिपीडियाला आधार पुरवणाऱ्या विकीमीडिया फाऊंडेशन (डब्ल्यूएमएफ) या संस्थेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. फ्रॅम नावाचा हा अॅडमिन कमीत कमी 11 विकिपीडिया संपादकांना त्रास देत होता, असा आरोप होता. त्यामुळे विकिपीडियाचे संपादक बिथरले असून त्यांच्यात बंड माजले आहे. या घटनेच्या काही आठवड्यांत कमीतकमी 21 विकिपीडिया प्रशासकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या सगळ्यावरून एकच गोष्ट लक्षात येते आहे, की इंटरनेट कंपन्या मोठ्या झाल्या की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होते. त्यांच्या मर्जीनुसार वापरकर्त्यांना वागवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आमचे खुले इंटरनेट आम्हाला परत द्या, असे म्हणायची वेळ आली आहे.