शाब्बास, जकार्ताकर! खरे नागरिक तुम्हीच!


वायू प्रदूषण ही जगभरातच अक्राळविक्राळ बनलेली समस्या आहे. विविध देशांतील सरकार आणि गैर-सरकारी संस्था या संदर्भात इशारे देत असतात आणि अभ्यासही करत असतात. यावर अनेक जण चिंता व्यक्त करतात मात्र पुढे त्याचे काहीच होत नाही. मात्र इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या रहिवाशांनी याबाबत आदर्श घालून दिला असून त्यांचे अनुकरण सर्वत्र व्हायला पाहिजे.

काय केल जकार्ताच्या रहिवाशांनी? तर या रहिवाशांनी चक्क वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सरकारविरूद्ध खटला दाखल केला आहे. जकार्ता शहरावर वायू प्रदूषणामुळे सातत्याने विषारी वायूचे अस्तर पसरलेले असते. ते धोकादायक पातळीवर गेल्यामुळे या नागरिकांनी सरकारविरुद्ध खटला दाखल केला आहे.

गेल्या महिन्यापासून संपूर्ण जकार्ताशहर या विषारी थराने वेढलेले आहे. पीएम 2.5 या नावाने ओळखल्या हानिकारक सूक्ष्मकणांचे हवेतील प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे सजग अशा 31 नागरिकांच्या गटांनी अध्यक्ष जोको विडोडो आणि पर्यावरण व वन मंत्रालय, आरोग्य मंत्रालय आणि जकार्ताच्या राज्यपालांच्या विरोधात दावा दाखल केला आहे.

खटला दाखल करणाऱ्यांमध्ये कार्यकर्ते, कार्यालयीनकर्मचारी आणि मोटारसायकल टॅक्सी चालकांचा समावेश आहे. या मुद्यावरून लोकांमध्ये जागरुकता यावी आणि सरकारला कार्य करणे भाग यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. शहरावर पसरलेल्या विषारी वायूच्या या थरामुळे गेल्या महिन्यात अनेक दिवस सकाळी जकार्ताचा समावेश जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये झाला होता. त्यामुळे नागरिकांना प्रदूषणविरोधी मास्क घालण्यास मजबूर व्हावे लागले आणि सोशल मीडियावरही त्यावरून मोठे वादळ उठले होते.

वायू प्रदूषण ही काही जकार्ताची एकट्याची समस्या नाही. चीनची राजधानी बीजिंग हेही जगात सर्वाधिक प्रदूषित शहरात गणल्या जाते. तेथील वाढते वायू प्रदूषण ही चीन सरकारची डोकेदुखी ठरली आहे.

फार दूर कशाला, आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्येही धुक्याने हाहाकार उडविणे ही नित्याची गोष्ट झाली आहे. हिवाळ्याच्या काळात प्रदूषणजन्य आजार थैमान घालतात. लोकांना श्वासही घेणे अवघड होते. श्वासावाटे शरीरात प्रवेश करणाऱ्या प्रदूषकांची पातळी कधीच धोक्याच्या पातळीवर गेली. याचा परिणाम आरोग्यावर जसा झाला आहे तसाच देशाची प्रतिमा आणि अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. दिल्लीमध्ये धुक्यामुळे विविध कंपन्यांमधील 5-10 टक्के कर्मचारी आजारी पडले आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या कामकाजावरही असर झाला आहे. असोचेम या उद्योगजगतातील सर्वोच्च संस्थेनेच एका सर्वेक्षणातून ही माहिती जाहीर केली होती.

असोचेम ने दिल्ली-एनसीआर भागांतील सुमारे 150 कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा अहवाल तयार केला होता. या सर्वेक्षणानुसार वायू प्रदूषणामुळे कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. बहुतेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की त्यांच्याकडे पाच ते 10 टक्के कर्मचारी कमी आहेत. कर्मचारी सतत आजारी असल्याचे सांगत आहेत. अनेक खासगी कंपन्यांनी तर आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. संघटनेचे सरचिटणीस डीएस रावत यांच्या मते तर, ‘पर्यावरण आणि वायु प्रदूषणासंबंधांतील समस्यांमुळे ‘ब्रँड इंडिया’च्या प्रतिमेला धक्का पोचेले आणि पर्यटनासारख्या क्षेत्रांवरही परिणाम होईल.’

या प्रदूषणाचा खरा फटका हा लहान मुलांना बसतो. संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील सुमारे 30 कोटी मुले बाहरी वातावरणातील इतक्या विषारी हवेच्या संपर्कात असतात, की त्यामुळे त्यांना गंभीर शारीरिक हानी होऊ शकते आणि त्यांच्या विकसनशील मेंदूवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जगातील प्रत्येक सात मुलांपैकी एक बालक अशा हवेत श्वास घेते. मुलांमधील मृत्युदराचे एक प्रमुख कारण वायू प्रदूषण हे आहे. दर वर्षी पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या जगातील 6,00,000 बालकांच्या मृत्यूचे मुख्य कारण वायु प्रदूषण हे आहे. प्रदूषणामुळे मुलांच्या फुफ्फुसांनाच हानी पोचत नाही, तर त्यांच्या मेंदूलाही नुकसान होते. प्रदूषित वातावरणात राहण्यास भाग पडणारी सर्वाधिक मुले दक्षिण आशियात राहतात व त्यांची संख्या सुमारे 62 कोटी एवढी आहे, असे युनिसेफने म्हटले आहे.

या सर्व परिस्थितीवर मार्ग जकार्ताकरांनी दाखवून दिला आहे. त्यांनी आपल्या सरकारला त्याची जबाबदारी दाखवून दिली आहे आणि आपण खरे नागरिक असल्याचेही दाखवून दिले आहे. म्हणूनच त्यांचे खास अभिनंदन करून शाब्बास, जकार्ताकर अशी दाद त्यांना दाद द्यावी लागेल. आता इतरांनीही त्यांचा मार्ग धरावा, हेच उत्तम.

Leave a Comment