भारताच्या वळणावर अमेरिका!


भारत आणि अमेरिका लोकशाहीचा पुरस्कार करणारे जगातील दोन मोठे देश. लोकशाही हा दोन्ही देशातील समान धागा आहे. मात्र भारतात घरभेद्यांची संख्या मोठी आहे आणि अमेरिकेत ती नाही, असे सर्वसामान्य मानण्यात येते. परंतु अलीकडच्या काही घटना पाहिल्या तर अमेरिका आणि भारत याही बाबतीत एका पातळीवर येत आहेत की काय, असा संशय येऊ लागतो. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जे घडले त्यातून तरी असेच दिसते.

चार जुलै हा अमेरीकेचा स्वातंत्र्यदिन. ब्रिटनपासून अमेरिकेने स्वतंत्र होण्याचा जाहीरनामा 4 जुलै 1776 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानिमित्त या दिवशी दरवर्षी वॉशिंग्टन डीसी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा अध्यक्ष ट्रम्प यांनी या कार्यक्रमाला देशभक्तीचा रंग देण्यासाठी अमेरिकी लष्कराचे रणगाडे वापरण्याचा निर्णय घेतला. सॅल्यूट टू अमेरिका असे या कार्यक्रमाचे नाव ठेवण्यात आले होते. हा दिवस साजरा करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठमोठ्या योजना आखल्या खऱ्या मात्र निदर्शकांनी काही त्यांना या दिनाचा आनंद पूर्णपणे घेऊ दिला नाही. ट्रम्प यांची योजना आधीपासूनच वादग्रस्त ठरली होती. त्यात निदर्शकांची मजल अमेरिकेचा झेंडा जाळण्यापर्यंत गेल्यामुळे या कार्यक्रमाला डाग लागला.

ट्रम्प यांनी या कार्यक्रमाची सर्व सूत्रे हाती घेतली होती. आजपर्यंतच्या अमेरिकी अध्यक्षांच्या इतिहासाशी हे विसंगत होते. हा ‘लोकांच्या जीवनात एकदाच येणारा असा कार्यक्रम’ ठरेल, असेही त्यांनी म्हटले होते. यावेळी परेडमध्ये अमेरिकी हवाई दलाची विमाने वापरण्यात आली, देशभक्तीची गाणी वाजविण्यात आली आणि हे कमी पडले म्हणून की काय, त्यांनी लिंकन मेमोरियल येथे एक लांबलचक भाषणही ठोकले! “अमेरिकेचा इतिहास हा योग्य आणि सत्य असलेल्या गोष्टींसाठी सर्वस्वाची बाजी लावणाऱ्या लोकांच्या एका महान राष्ट्राची गाथा आहे,” असे ते म्हणाले.

ट्रम्प यांच्या या कार्यक्रमाला बुद्धिवंत, विचारवंतांसोबतच अमेरिकी सैन्यात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचाही विरोध होता, हे विशेष. ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीही सेनेत सेवा बजावलेली नाही त्याने सेनेच्या कामगिरीची बढाई मारावी, हे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. काही ठिकाणी तर ट्रम्प यांच्या समर्थकांनी या माजी सैनिकांशी वादही घातला. परंतु त्यांचा हा वाद विकोपाला गेला नाही.

मात्र या कार्यक्रमाला विरोध म्हणून वॉशिंग्टन डीसी येथे व्हाईट हाऊसच्या बाहेर डाव्या विचाराच्या निदर्शकांनी निदर्शने केली आणि अमेरिकेचा ध्वजही जाळला. या संदर्भात पोलिसांनी दोघा जणांना अटक केली. यातील एकाचे नाव जोयी जॉनसन असे असून तो राजकीय कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या व्यक्तीची ओळख मात्र जाहीर करण्यात आली नाही.

जॉनसन याने यापूर्वीही 1984 मध्ये तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या विरोधात अमेरिकेचा झेंडा जाळला होता. त्यानंतर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवण्यात आला. मात्र 1989 मध्ये त्याच्या या खटल्याचा निकाल लागून त्याला सोडण्यात आले. अमेरिकेच्या इतिहासात हा खटला ऐतिहासिक मानला जातो कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 50 राज्यांपैकी 48 राज्यांमध्ये अमेरिकी ध्वजाचा अवमान करण्यावर असलेली बंदी रद्द केली होती.

जोयी जॉनसन हा रिव्होल्यूशनरी कम्युनिस्ट पार्टी, यूएसए या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे हात हातात घेऊन अमेरिकेच्या ध्वजाला आग लावली. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हा ट्रम्प यांचा नारा आहे. त्याला उत्तर म्हणून ‘अमेरिका व्हाज नेव्हर ग्रेट’ अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या.

त्यावर ट्रम्प यांच्या समर्थकांनाही चेव चढला. त्यांनीही ‘ट्रम्प 2020’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा भव्यदिव्य कार्यक्रम चालू असताना आणि रोषणाई होत असताना या दोन गटांमध्ये मात्र धुमश्चक्री सुरू होती. पोलिसांनी या निदर्शकांना बेड्या घालून त्यांना तेथून पिटाळले.

ही सर्व दृश्ये आणि हा सर्व प्रकार आपल्याकडे काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या प्रकारासारखाच होता. देशभक्ती आणि देशविरोधाची दृश्ये जवळपास एकसमान होती. भारताला ही गोष्ट नवी नाही, मात्र ऐन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अमेरिकेत असे काही होणे हे अभूतपूर्व आहे. एकप्रकारे अमेरिका भारताच्या वळणावर जाते की काय, असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे.

Leave a Comment