व्हीनस विलियम्सला पराभूत करणारी कोरी गॉफ आहे तरी कोण?


इंग्लंड येथे जागतिक ख्याती असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली असून, या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये एका पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने, सात वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या टेनिस सुपरस्टार व्हीनस विलियमला पराभूत केले. आतापर्यंत पाच वेळा विम्बल्डन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या व्हीनसपेक्षा वयाने तब्बल चोवीस वर्षे लहान असलेल्या अमेरिकेच्या कोरी गॉफने व्हीनसला पराभूत करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आजवर, आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये स्थान मिळविणारी कोरी ही वयाने सर्वात लहान टेनिसपटू असून, तिने व्हीनसचा ६-४,६-४ अश्या सरळ सेट्समध्ये पराभव करीत प्रेक्षकांची दाद मिळविली. व्हीनस आपली आदर्श असून, तिचाच पराभव केल्याने मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत हे नक्की सांगता येणार नाही असे म्हणत या सामन्यामधील आपला जय अगदी स्वप्नवत वाटत असल्याचे कोरी म्हणते.

कोरी गॉफला कोको या टोपणनावानेही ओळखले जाते. सेरेना आणि व्हीनस विलियम्स या बहिणींना टेनिस खेळताना पाहून आपल्यालाही टेनिस खेळण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे कोरी म्हणते. सेरेना आणि कोरी यांचे प्रशिक्षक एकच असून, सेरेनानेही कोरीच्या खेळाचे मनापासून कौतुक करीत तिच्या विजयाबद्द्ल तिचे अभिनंदन केले आहे. जागतिक पातळीवर सध्या कोरीचे ३०९वे स्थान असून, विम्बल्डन सामने सुरु होण्याच्या पाच दिवस आधी ‘वाईल्ड कार्ड’ मार्फत तिची या स्पर्धेमध्ये एन्ट्री झाली. ज्यावेळी आपली निवड झाल्याचे कोरीला कळले त्यावेळी कोरी स्वतःसाठी कपडे खरेदी करण्यात मग्न होती.

कोरी अद्याप शाळेत शिकत असून, क्वालिफायिंग मॅच खेळण्याच्या एक रात्र आधी, ती तिच्या आगामी शालेय परीक्षेची तयरी करीत होती. कोरीच्या कारकिर्दीची धुरा टीम 8 मॅनेजमेंट कंपनीने सांभाळली असून, सुप्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर आणि त्याचा एजंट टोनी गॉडसिक यांची ही कंपनी आहे. रॉजर फेडररने ही कोरीच्या खेळाविषयी समाधान व्यक्त केले असून, कोरीचे यश याहूनही मोठे असेल अशी खात्री खात्री रॉजरला आहे. कोरीने टेनिसचे प्राथमिक धडे आपल्या वडिलांकडून घेतले असून, तिचे वडील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या वतीने बास्केटबॉल खेळत असत, तर कोरीची आई उत्कृष्ट जिम्नास्ट आहे. कोरीला टेनिस प्रशिक्षणाच्या उत्तम साधी लाभाव्यात यासाठी कोरी सात वर्षांची असनाच तिच्या परिवाराने अटलांटाहून फ्लोरिडाला स्थलांतर केले होते.

Leave a Comment