पावसाळ्यामध्ये या ठिकाणांना भेटी देणे पर्यटकांनी टाळावे


जून आणि जुलै महिन्यांमध्ये निसर्ग हिरवीगार शाल पांघरतो, वातावरण अतिशय आल्हाददायक होते, आणि अश्या वेळी पर्यटकांच्या भ्रमंतीचा उत्साह ही ओसंडून वाहू लागतो. भटकंती जवळपासच असो, किंवा दूरवर असो, प्रत्येक सहलीचा आनंद हा तितकाच जास्त असतो. उत्साहाच्या भरामध्ये अनेकदा एखाद्या ठिकाणी सहल नक्की केली जाते, मात्र कधी वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना आपल्या इप्सित ठिकाणी पोहोचताना नाकी नऊ येतात, तर कधी घाटामध्ये दरड कोसळल्याने पुढचा सर्व रस्ताच बंद होतो आणि इतक्या उत्साहाने भटकंतीसाठी बाहेर पडणाऱ्या मंडळींच्या सगळ्याच उत्साहावर पाणी पडते. असे काहीसे घडून आपली सहल रद्द होण्याच्या ऐवजी जर आधीपासूनच भटकंतीसाठी कुठे जायचे याचा निर्णय जर विचारपूर्वक घेतला, तर अश्या अडचणींना तोंड द्यावे न लागता सहल आपल्या मनासारखी पार पडता येईल. त्यासाठी ऐन पावसाळ्यामध्ये भटकंतीसाठी काही ठिकाणे टाळण्याचा विचार करावा.

पश्चिम बंगालमधील कॅलिमपाँग हे हिल स्टेशन पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी भरपूर पाउस पडत असला, तरी या ठिकाणी पूरपरिस्थिती मात्र अभावानेच उद्भवते. या ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे पर्यटनावर फारसा दुष्प्रभाव पडत नसला, तरी बागडोगरा पासून कॅलिमपाँगपर्यंतचा रस्ता घाटाचा असून या घाटामध्ये मात्र दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. दरड कोसळली असता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होतो. मार्गातले अडथळे दूर होईपर्यंत पर्यटक घाटामधेच अडकून पाण्याच्या घटना पावसाळ्यामध्ये वारंवार घडत असतात. तसेच या भागातील रस्ताही अतिशय खराब असून त्यामुळेही वाहतूक सावकाशीने सुरु असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे ठिकाण टाळणेच उत्तम.

आसाम राज्याकडे सध्या पर्यटकांचा वाढता ओढा दिसत असला, तरी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इकडची भ्रमंती टाळणेच बरे. ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने जोरहाट, काझीरंगा अभयारण्य, आणि गुवाहाटी येथे पावसाळ्यामध्ये पूर परिस्थती उद्भवते. आसामची खासियत असलेले बहुतेक चहाचे मळे आणि अनेक स्थानिक गावे पाण्याखाली जात असून पावसाळ्यामध्ये येथे आपत्कालीन स्थिती उद्भवणे सामान्य आहे. जोरहाटला पोहोचणे शक्य असले, तरी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काझीरंगा अभयारण्य मात्र पर्यटकांसाठी खुले नसते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये फेरफटका मारायचा बेत असल्यास तो बेत रद्द करावा हेच चांगले. आसामला भेट देण्यासाठी ऑक्टोबरपासून पुढचे दिवस उत्तम आहेत.

पावसाळ्यामध्ये पहाडी भागांमध्ये भटकंतीला जाण्यापूर्वी तिथे दरडी कोसळून निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींचा विचार अवश्य करायला हवा. त्यामुळे या दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश सारख्या डोंगराळ भागामध्ये असलेल्या कसोल, मनाली किंवा मॅकलियोडगंज सारख्या पर्यटनस्थळांना भेट देणे त्रासाचे ठरू शकते. या ठिकाणी घाटांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यामध्ये वारंवार घडत असतात. हिमाचल प्रदेशमध्ये भटकंती साठी जाण्याचा विचार असला, तर त्यासाठी एप्रिल-मे, किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने सर्वोत्तम. रणथंबोर अभयारण्य देखील पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय असून, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, म्हणजेच जुलै महिन्यामध्ये रणथंबोरचा किल्ला आणि सवाई मानसिंह अभयारण्य पर्यटकांसाठी खुले असले, तरी रणथंबोर अभयारण्य मात्र पर्यटकांसाठी बंद असते. पावसाळ्यामध्ये येतील हवामान अतिशय दमट असते. त्यामुळे येथे येण्यासाठी डिसेंबर ते मार्च हा काल सर्वोत्तम समजला जातो. कर्नाटकातील हंपी या ठिकाणी देखील पावसाळ्यामध्ये हवामान अतिशय दमट असते, त्यामुळे येथे जाण्यासाठी डिसेम्बर-जानेवारीचा काळ उत्तम. हृषीकेश हे ठिकाण रिव्हर स्पोर्ट्स साठी लोकप्रिय आहे. पण पावसाळ्यामध्ये गंगा नदीच्या पाण्याच्या पातळी खूपच वाढत असून, पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असतो. त्यामुळे अश्या ठिकाणी रिव्हर वॉटर राफ्टींग करणे नवख्या मंडळींसाठी धोकादायक ठरू शकते.

Leave a Comment