‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाली अखेर नवी ‘दयाबेन’


‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सब टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिकेमधील ‘दयाबेन’ हे प्रमुख पात्र गेले अनेक महिने मालिकेमध्ये दिसत नव्हते. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी हिने २०१७ साली प्रसूती झाल्यानंतर तिने आपल्या नवजात मुलीच्या संगोपनासाठी वेळ देणे गरजेचे असल्याने या मालिकेमधून काही काळापुरती रजा घेतली होती. मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही दिशाची शो-वापसी होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. दिशाला मालिकेच्या प्रत्येक भागासाठी दिल्या जाणाऱ्या मानधनावरून दिशा आणि मालिकेचे निर्माते यांच्यामध्ये मतभेद होते. तसेच दिशाने मालिकेमध्ये परतण्यासाठी काही अटीही निर्मात्यांच्या समोर ठेवल्या होत्या. मात्र निर्मात्यांनी या अटी अमान्य केल्याने आणि दिशाचे मानधनही वाढविण्यास नकार दिल्याने दिशा या मालिकेमध्ये परतणार किंवा नाही यावर निर्णय होऊ शकत नव्हता.

मध्यंतरी दिशा या मालिकेमध्ये परतणार असून, लवकरच मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात करणार असल्याचे वृत्त होते. पण त्यानंतरही दिशा शो मध्ये न परतल्याने मालिकेच्या चाहत्यांच्या मनामध्ये संभ्रम कायम होता. तसेच मालिकेचे निर्माते देखील ‘दयाबेन’ची भूमिका साकारण्यासाठी नव्या अभिनेत्रीच्या शोधात असल्याची वृत्तेही सातत्याने येत होती. आता मात्र ‘दयाबेन’ मालिकेमध्ये दिसणार किंवा नाही या चाहत्यांच्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले असून, ‘दयाबेन’च्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीची निवड जवळजवळ निश्चित झाली असल्याचे वृत्त आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमध्ये आता दिशा वाकानीच्या ऐवजी विभूती शर्मा ही अभिनेत्री ‘दयाबेन’च्या भूमिकेमध्ये दिसणार असल्याचे वृत्त आहे. विभूतीने या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट दिली असून, तिचा अभिनय निर्मात्यांना पसंत पडला असल्याचे समजते, त्यामुळे विभूती शर्माची निवड आता जवळजवळ निश्चित झाली आहे. विभूतीने यापूर्वी काही मालिकांमध्ये भूमिका केल्या असून, ‘बडे अच्छे लगते हैं ‘ या मालिकेतील तिची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती.

Leave a Comment