गढकुंडार – भारतातील रहस्यमयी किल्ला


भारतामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांपैकी राजा-महाराजांच्या शासनकाळामध्ये बांधल्या गेलेल्या अनेक किल्ल्यांचाही समावेश आहे. या किल्ल्यांपैकी अनेक किल्ले असे आहेत, ज्यांच्याशी निगडीत काही रहस्ये आजतागायत उकललेली नाहीत. अश्याच किल्ल्यांपैकी एका आहे गढकुंडारचा किल्ला. उत्तर प्रदेश राज्यातील झांसी जवळ सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर हा किल्ला उभा आहे. या किल्ल्यावर अकराव्या शतकामध्ये उभारली गेलेली पाच मजली वास्तू आजही उभी आहे. या पाच मजल्यांपैकी तीन मजले भूपृष्ठाच्या खाली, तर दोन मजले भूपृष्ठाच्या वर बनविले गेले आहेत. या किल्ल्याचे निर्माण नेमके कोणत्या वर्षी झाले आणि कोणी करविले याचे स्पष्ट उल्लेख इतिहासामध्ये आढळून आले नसून, हा किल्ला किमान पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वी बनविला गेला असावा असा अंदाज पुरातत्ववेत्त्यांनी वर्तविला आहे. त्या काळी या प्रांतामध्ये चंदेल, बुंदेल आणि खंगार वंशाच्या राजांचे शासन होते.

हा किल्ला अतिशय बळकट असून, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने या किल्ल्याची जडणघडणही तशीच आहे. या किल्ल्याची गणना भारतातील सर्वात रहस्यमयी किल्ल्यांमध्ये केली जात असून, या किल्ल्याशी निगडीत अनेक आख्यायिकाही आहेत. एके काळी या किल्ल्याच्या परिसरातील एका गावामध्ये लग्नसमारंभ असल्याने वरपक्षाकडील मंडळींचे वऱ्हाड लग्नासाठी गावामध्ये येऊन दाखल झाले. जवळच किल्ला असल्याने या किल्ल्यामध्ये भटकंती करून येण्याचा बेत वऱ्हाडी मंडळीनी आखला, आणि त्यानुसार बहुतेक सर्वच वऱ्हाडी मंडळी किल्ला फिरून पाहण्यासाठी किल्ल्यामध्ये दाखल झाली. किल्ल्यामध्ये आल्यानंतर काही मंडळी किल्ल्याच्या तळघरामध्येही गेली. त्यानंतर मात्र ही मंडळी नेमकी गेली कुठे, याचा शोध लागेना. बरोबरच्या इतर लोकांनी या मंडळींचा सगळीकडे कसून शोध घेतला, मात्र तळघरामध्ये शिरलेली मंडळी हवेमध्ये विरुन गेल्याप्रमाणे गायब झाली.

किल्ल्यामध्ये गायब झालेल्या वऱ्हाडी मंडळींचा आजतागायत कोणताच मागमूस लागू शकलेला नाही. ही घटना घडून गेल्यानंतर या किल्ल्याच्या परीसरामध्ये अनेक विचित्र घटना घडत राहिल्या. या कारणास्तव किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अस्तित्वात असलेले सर्व दरवाजे कायमचे बंद करण्यात आले. या किल्ल्याचा अंतर्भाग एखाद्या भुलभुलैय्या प्रमाणे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे किल्ल्याच्या अंतर्भागामध्ये प्रवेश करणारी मंडळी वाट चुकण्याचे अनेक किस्से इथे घडले आहेत. या किल्ल्यामध्ये प्राचीन खजिना लपविला गेला असल्याची आख्यायिकाही प्रसिद्ध असल्याने अनेक हौशी मंडळी खजिना शोधण्यासाठी येथे येत असत. मात्र कोणाच्याही प्रयत्नांना यश आले नाहीच, शिवाय खजिना शोधण्याच्या नादात किल्ल्याच्या भुलभुलैय्यामध्ये शिरल्याने अनेक मंडळी येथून कायमची गायब मात्र झाली. या मंडळींचे पुढे काय झाले हे आजवर समजू शकलेले नाही.

Leave a Comment