विमान लँँड करीत असताना कार्गोमधून खाली पडला मृतदेह !


लंडन येथील हीथ्रो एअरपोर्टच्या धावपट्टीवर केन्या एअरलाईन्सचे विमान उतरण्याच्या तयारीत असताना अचानक त्या विमानाच्या कार्गो होल्डमधून एका इसमाचा मृतदेह खाली पडल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. विमानातून पडलेल्या या इसमाचा मृतदेह काही वेळानंतर दक्षिण लंडनमधील क्लॅपहम परिसरामध्ये असलेल्या एका घराच्या बगिच्यामध्ये आढळला. हा इसम विमानाच्या उड्डाणापूर्वीच कार्गो होल्डमध्ये गुपचूप शिरला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस या मृत्यूला संशयास्पद परिस्थितीमध्ये घडलेला मृत्यू म्हणून पहात नसले, तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच तपासकार्य पुढे सरकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

विमानतळावरील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांनी विमानाच्या लँडिंग गियर कंपार्टमेंटमध्ये तपासणी केली असता, तिथे एक लहान बॅग, पाण्याची बाटली आणि थोडेसे खाद्यपदार्थ असे सामान सापडले आहे. क्लॅपहम मधील आपल्या घराच्या बगिच्यामध्ये सूर्यस्नान करीत बसलेल्या इसमापासून काही अंतरावरच या माणसाचा मृतदेह पडल्याने काही काळ सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. नंतर मात्र सर्व प्रकारचा खुलासा झाल्याने पुढील तपासकार्य सुरु करण्यात येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. केन्या एअरवेज फ्लाईट KQ100 लंडन येथील हीथ्रो विमानतळावरील धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीमध्ये असल्याने फ्लाईट क्र्यूने विमान जमिनीवर उतरविण्यासाठी विमानाची चाके, म्हणजेच लँडिंग गियर सक्रीय केले. तेव्हा या मनुष्याचा मृतदेह लँडिंग गियर कंपार्टमेंट मधून बाहेर फेकला गेला.

एकूण ६,८४० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या विमानाला एकूण उड्डाणासाठी आठ तास पन्नास मिनिटे इतका अवधी लागला. तितका वेळ लँडिंग गियर कंपार्टमेंटमध्ये दडून राहिल्याने या व्यक्तीला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा न झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक निदान तज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे. विमान धावपट्टीवर उतरत असताना लँडिंग गियर खाली केल्यानंतर त्यातून मृतदेह पडण्याचा हा धक्कादायक प्रकार या पूर्वीही घडून गेला आहे. सप्टेंबर २०१२ साली अंगोला येथून आलेल्या ब्रिटीश एअरवेजच्या विमानामधून जोस मटाडा नामक इसमाचा मृतदेह कार्गो होल्म्सधून पडला होता. जोसचे पोस्ट मॉर्टम केले असता, सुमारे अकरा तास तो जिवंत असला, तरी -६० अंश तापमान आणि प्राणवायूचा अपुरा पुरवठा यामुळे अखेरीस त्याला मृत्यू आला असल्याचे निदान करण्यात आले होते. २०१५ साली देखील दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून हीथ्रो कडे जाणाऱ्या एका विमानाच्या कार्गो होल्डमधून एका मनुष्याचा मृतदेह रिचमंड भागातील एका घराच्या परिसरामध्ये पडला होता.

Leave a Comment