दाऊद पाकिस्तानातच – अमेरिकेची कबुली कामी येईल?


आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि भारताला हवा असलेला सर्वात प्रमुख गुन्हेगार दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचे अमेरिकेनेही मान्य केले आहे. दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीतील त्याचा जवळचा सहकारी जाबिर मोतीवाला याचे लंडनमधून अमेरिकेला प्रत्यर्पण व्हावे, यासाठी अमेरिकेच्या केंद्रीय तपास संस्थेने (एफबीआय) वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान हा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे मोतीवाला याचे प्रत्यर्पण होऊ नये, यासाठी पाकिस्तानी कूटनीतीज्ञ कसोशीचा प्रयत्न करत आहेत.

मोतीवाला हा दाऊदच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी असून त्याला ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. एफबीआयनेच त्याच्या लंडनमध्ये असण्याची खबर दिली होती आणि पैशांची अफरातफर व मादक पदार्थांच्या तस्करीचा त्याच्यावर आरोप आहे. यावेळी युक्तिवाद करताना ‘डी-कंपनी’च्या बचाव पक्षाच्या वकीलांनी दावा केला, की जाबिर मोतीवाला अत्यंत नैराश्यग्रस्त असून त्याला अफरातफर, मादक पदार्थांची तस्करी आणि अंडरवर्ल्डच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा सामना करण्यासाठी अमेरिकेत पाठवता येणार नाही. या वकिलांना अर्थातच पाकिस्तानी राजनयिकांचे पाठबळ होते.

मोतीवाला याला वाचविण्यासाठी पाकिस्तानी उच्चायोगाने सुरूवातीपासूनच या खटल्यात खोडा आणण्याचा प्रयत्न केला. मोतीवाला हा पाकिस्तानातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यावसायिक असल्याचे सांगून त्यासाठी एक पत्र त्याचे वकील एडवर्ड फिट्जगेराल्‍ड यांनी दाखल केले होते. त्याला अमेरिकेकडे सोपविले तर तो दाऊदच्या कराचीतून चालणाऱ्या अंडरवर्ल्ड नेटवर्कची सगळी माहिती उघड करेल, ही भीती पाकिस्तानला भेडसावत आहे. अमेरिकेने यापूर्वीच दाऊदला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे.

डी कंपनीचे जाळे पाकिस्तान, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीत पसरलेले असून एफबीआय त्याचा शोध घेत आहे, असे अमेरिकी सरकारच्या वतीने युक्तिवाद करणारे वकील जॉन हार्डी यांनी न्यायालयाला सांगितले. या टोळीचा म्होरक्या दाऊद इब्राहीम या नावाचा भारतीय मुसलमान असून तो पाकिस्तानात अज्ञातवासात राहत आहे, मोतीवाला मोठ्या संख्येने प्रवास करून आपला बॉस दाऊदसाठी अंडरवर्ल्ड गुन्ह्यांशी संबंधित बैठका घेतो. भारतीय नागरिक असलेला दाऊद आपला भाऊ अनीस याच्यासह गुन्हे करतो आणि भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणल्याबद्दल तो पोलिसांना हवा आहे, असे त्यांनी सांगितले.

“दाऊद त्यांचा प्रमुख आहे. तो व त्याचा भाऊ हे भारतातून १९९३ पासून फरारी आहेत. गेल्या १० वर्षांत डी कंपनीने अमेरिकेतही कारवाया केल्या आहेत. मोतीवाला थेट दाऊदला रिपोर्ट करतो आणि खंडणी वसुली, कर्जवसुली व हवाला व्यापार हे त्याचे मुख्य धंदे असल्याचे एफबीआयच्या तपासातून उघड झाले आहे,” असे हर्डी यांनी न्यायालयापुढे सांगितले.

मोतीवाला एफबीआयच्या जाळ्यात अडकण्याची कहाणी मोठी मनोरंजक आहे. एफबीआयच्या पाकिस्‍तानी मूळ असलेल्या एजंटांनीच त्याला अडकवले. या एजंटांनी मोतीवालाशी ए-क्‍लास हेरॉईनचा सौदा केला होता. तसेच पैसा फिरविण्यासाठी त्याची मदतही मागितली होती. बॅरिस्टर जॉन हार्डी यांनीच न्यायालयात ही माहिती दिली.

एफबीआय 2005 पासूनच मोतीवालांच्या मागे लागली आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाचे हे, की एफबीआयचे एजंट जेव्हा मोतीवालाला कराचीत भेटले होते तेव्हा त्यानेच आपण डी-कंपनीशी संबंधित असल्याचे तसेच त्यांच्या काळ्या कृत्यात सहभागी असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर हेरॉईन अमेरिकेत पोचवल्यानंतर जेव्हा मोतीवालाला पैसे मिळाले नाहीत तेव्हा त्याने एफबीआय एजंटला धमकीही दिली होती. त्यावेळी या एजंटने मोतीवालाला २० हजार डॉलरची रक्कम दिली होती. ही रक्कम कराचीतील एका खात्यात जमा करण्यात आली होती. तिचा पुरावाही न्यायालयात सादर करण्यात आला.

मोतीवाला याचे अमेरिकेकडे हस्तांतरण हे दाऊदसोबतच पाकिस्तानातील त्याच्या आश्रयदात्यांसाठीही अत्यंत धक्कादायक असेल, यात काही संशय नाही. भारतातील अनेक माध्यमांनी यापूर्वीच पाकिस्तान दाऊदला कशाप्रकारे आश्रय देत आहे, याची पोलखोल केली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये टाइम्स नाऊ वाहिनीने पाकिस्तान सरकारने दाऊदला कराचीतील एका उपनगरात सुरक्षित घर दिल्याचे दाखवले होते. हिंदुस्तान टाईम्सने 2015 मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सुरक्षा संस्थांनी टेलिफोन बिल आणि पाकिस्तानी पासपोर्टच्या प्रतींसह दाऊद इब्राहिम आणि त्याचे कुटुंब पाकिस्तानात असल्याचा भक्कम पुरावा सादर केला होता. त्या दूरध्वनी बिलावर दाऊदचा पत्ता डी -13, ब्लॉक 4, कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी, एसएच 5, क्लिफ्टन असा होता आणि ते बिल पाकिस्तान टेलिकॉम कंपनी लिमिटेडने दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिच्या नावाने जारी केले होते.

थोडक्यात अमेरिकेच्या कबुलीमुळे दाऊदभोवतीचा फास जास्त आवळला गेला आहे. फक्त ही कबुली आपल्या काही कामी येईल का नाही, हा प्रश्न आहे.

Leave a Comment