काँग्रेसला वंचितची ऑफर – एवढी चेष्टा बरी नव्हे!


घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हणतात. सध्या काँग्रेसची अवस्था डिट्टो अशीच झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव काय झाला, कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी अवस्था पक्षाची झाली आहे. काल-परवा आलेले नेते आणि पक्षही काँग्रेसला उपदेशाचे डोस पाजत आहेत. आता हेच पाहा ना, वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष आता-आता लोकसभेच्या वेळेस निर्माण झालेला. या पक्षाला लोकसभेत फारसे काही यशही हाती आले नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना अस्मान दाखवण्यात वंचितची महत्त्वाची भूमिका होती. याचाच फायदा घेऊन आता वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी सौदेबाजी करत आहे. एवढ्यावरच राहिले असते तरी बरे होते. मात्र वाटाघाटीच्या नावाखाली वंचितने चक्क काँग्रेसचा उपमर्द केला आहे. अर्थात ही गंमत असल्याचे सांगून काँग्रेसने संभावना केली असली तरी एका राष्ट्रीय पक्षाची एवढी चेष्टा बरी नव्हे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्याचे कारण देऊन भारिप बहुनज महासंघाचे ॲड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी एकत्र आले आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडी नावाची एक आघाडी उघडली. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांमध्ये या आघाडीने जोरदार प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना फटका बसणार असा अंदाज होता आणि तो खराही ठरला. वंचित आघाडीच्या उमेदवारांनी वैयक्तिक प्रचारात मुसंडी मारली. प्रत्यक्ष निकालानंतर या उमेदवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी नुकसान केल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नाही तर औरंगाबादेत वंचित आघाडीचे इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडूनही आले.

वंचित आघाडीच्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. आघाडीने सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यामुळे किमान सहा मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पडले होते. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे यांसारख्या दिग्गजांच्या पराभवामागे वंचित बहुजन आघाडी असल्याचे सांगितले गेले.

दलित आणि मुस्लिम मतदारांवर वंचित आघाडीची सगळी भिस्त आणि हे मतदार काँग्रेस व राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार मानले जातात. या ना त्या कारणांनी हे दोन्ही समुदाय काँग्रेस आघाडीपासून दुरावले गेले आहेत. त्यामुळे वंचित आघाडीला जवळ करणे ही काँग्रेसची मजबुरी बनली आहे. त्यासाठीच लोकसभेच्या रणसंग्रामातही वंचित आघाडीला जवळ करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. मात्र आंबेडकर यांनी बारामती, माढा, नांदेडसह २२ जागा वंचित आघाडीसाठी मागितल्या आणि त्यामुळे ही प्रस्तावित महाआघाडी होण्यापूर्वीच बारगळली.

आता तोच प्रयत्न पुन्हा सुरू झाला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीला पुन्हा सोबत घेऊ पाहत आहे. वंचित आघाडीला विधानसभेच्या २५ ते ३० जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखविली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

मात्र वंचित आघाडीने मंगळवारी काँग्रेसवर बॉम्बच टाकला. “आजपर्यंत काँग्रेस वंचितांच्या मतांवर निवडून आली आहे. मात्र आता ही मते वंचित आघाडीकडे वळली आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही वंचित आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. म्हणून विधानसभेच्या सर्व जागा लढण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही काँग्रेसला ४० जागा देण्यास तयार आहोत. काँग्रेसला आमच्यासोबत यायचे असेल तर त्यांनी थेट वंचित आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधावा. यावर निर्णय घेण्यासाठी आम्ही काँग्रेसला १० दिवसांचा वेळ देत आहोत. अन्यथा वंचित आघाडी लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल,” असा इशारा पडळकर यांनी दिला.

पडळकर यांच्या या इशाऱ्याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर न मिळते तरच नवल. वंचित आघाडीचा हा प्रस्ताव म्हणजे एक गंमत आहे आणि त्यांनी थोडा गंभीरपणे विचार करावा, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सावंत यांचे म्हणणे योग्य आहे. काँग्रेस आज गलितगात्र असली तरी आजही महाराष्ट्रातच नाही तर देशातही संघटनेचे सर्वात मोठे जाळे काँग्रेसकडे आहे. जिल्हा परिषद, ग्राम पंचायत व अन्य स्थानिक संस्थांमध्ये काँग्रेसला भाजपखालोखाल मते मिळाली आहेत. आज पराभवाच्या गर्तेत असला तरी त्याच्या सत्ताधारी असण्याला फार काळ लोटलेला नाही. अन् अशा पक्षाला लहान मुलाला वाकुल्या दाखवाव्यात त्या प्रमाणे वंचित आघाडी 40 जागा देऊन चेष्टा करत आहे. राजकारणात चढ-उतार चालत असतातच, पण एखाद्याची एवढी चेष्टाही बरी नव्हे!

Leave a Comment