९० वर्षीय मोतीलाल व्होरा होऊ शकतात काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष


नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कोण दावा ठोकणार यावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सध्या ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी व्होरा यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. दरम्यान, या वृत्ताचे व्होरा यांनी खंडन केले आहे. आपल्याला याविषयी काहीच माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहणे ही माझ्यासाठी सन्माननीय बाब होती. मी या संधीबद्दल ऋणी आहे आणि माझे या संघटनेवर नितांत प्रेम आहे. मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. जे घडले ते पक्षाच्या वाढीसाठी चिंताजनक आहे. या कारणाने मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याच्या स्वरूपाचे पत्र लिहीत आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता आपण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नसल्याचे सांगितले आहे.

यानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दावेदारांविषयी चर्चा सुरू आहे. नवीन अध्यक्षांच्या नेमणुकीपर्यंत ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवण्यात येईल, अशी चर्चा आहे.

Leave a Comment