पावसाळ्यामध्ये ट्रेकसाठी जाताना…


यंदाच्या वर्षी उन्हाळ्याने हैराण होत असतानाच, रिमझिम बरसणाऱ्या पावसाची वाट सर्वच जण मोठ्या आतुरतेने पहात होते. काही दिवसांपूर्वीच वरुण राजाचे आगमन झाले असून, त्यामुळे सर्व वातावरण आल्हाददायक झाले आहे. पावसाला सुरुवात झाली, की ट्रेकिंग प्रेमीही भटकंतीच्या कार्यक्रमांची आखणी सुरु करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ट्रेकिंगसाठी जाताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ऐन पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगचा कार्यक्रम आखला असल्यास सर्वप्रथम आपण नेत असलेली बॅग किंवा सॅक ‘वॉटरप्रूफ’ असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच आपल्यासोबत हलके, आणि लवकर वाळतील असे कपडे आणि रेनकोट जरूर ठेवावा. ट्रेकिंग साठी आपण वापरणार असलेले शूज उत्तम ‘ग्रिप’ असणारे हवेत. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगसाठी जाताना बहुतेक ठिकाणी ओल आणि निसरडे रस्ते असल्याने पाय घसरून पडण्याचा धोका टाळण्यासाठी उत्तम ग्रिप असणारे शूज घालणे आवश्यक आहे.

ट्रेकिंगला जाण्याचे ठिकाण वस्तीपासून दूर असल्यास आपल्यासोबत खाण्याचे कोरडे पदार्थ आणि पाणी जरूर ठेवावे. तसेच चांगला, दूरवर प्रकाशझोत जाईल असा टॉर्चही बरोबर असावा. प्राथमिक औषधोपचाराची साधने ही सोबत असावीत. मोबाईल चार्ज करण्यासाठी बॅटरी बँक बरोबर न्यावी. डासांपासून संरक्षण होण्यासाठी मॉस्किटो रीपेलंट स्प्रे सोबत ठेवावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त आवश्यक औषधे, बँडेज इत्यादी वस्तूही सोबत असाव्यात. आपले पैशांचे पाकीट, कॅमेरा, मोबाईल फोन ट्रेकिंगच्या वेळी प्लास्टिकच्या निरनिराळ्या झिप लॉक पाऊचेसमध्ये ठेवावेत, जेणेकरून या वस्तूंमध्ये पाणी शिरू शकणार नाही. ट्रेकसाठी जात असताना, जर त्याठिकाणी इंटरनेट सेवा सुरु राहणार असेल, तर आपल्या मोबाईल फोनवर हवामानाचा अंदाज अचूक वर्तवू शकणारी अॅप्स डाउनलोड करून घ्यावीत. या अॅप्सच्या मदतीने येणाऱ्या काही तासांमध्ये हवामान कसे असणार आहे, पाऊस साधारण केव्हा आणि किती पडण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो.

जिथे ट्रेकिंग करावयास जायचे असेल, त्या ठिकाणाबद्दलची पूर्ण माहिती आधीपासूनच करून घेणे आवश्यक आहे. आपण ट्रेकिंग करणार असलेल्या ठिकाणापासून वस्ती, आणि रुग्णालय, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप सारख्या सुविधा किती अंतरावर आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच आपण ज्या ठिकाणी जाणार असू ते ठिकाण संपूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून घेऊन मगच कार्यक्रम आखावा. जर एकट्यानेच ट्रेकिंग साठी बाहेर पडणार असाल, तर अवघड डोंगर दऱ्या, किंवा घनदाट अरण्यात शिरण्याचा मोह आवरावा.

Leave a Comment