चंद्रावरच्या स्वारीची पन्नाशी – ही तर कंपन्यांची पर्वणी


ता. 20 जुलै 1969. जगभरातील श्रोते एक धावते वर्णन ऐकण्यासाठी रेडियो संचाजवळ बसले होते. ज्या थोड्या लोकांकडे टीव्ही होते ते टीव्हीसमोर खिळून बसले होते. मानवी इतिहासात पहिल्यांदाच माणूस चंद्रावर पाय ठेवणार होता. अखेर तो क्षण आला आणि अपोलो 11 हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. एडविन उर्फ बझ ऑल्ड्रिन आणि नील आर्मस्ट्राँग या जोडगोळीने चंद्रावर पाऊल ठेवले. “एका मानवाचे हे एक छोटे पाऊल मात्र अखिल मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,” असे आर्मस्ट्राँग यांनी म्हटलेले वाक्य इतिहासात कोरले गेले आहे. त्या अभूतपूर्व घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शास्त्रज्ञांनी काही करो की न करो, कंपन्यांनी मात्र मार्केटिंगची जय्यत तयारी केली आहे.

नासा संस्थेने राबविलेल्या त्या पहिल्या मोहिमेच्या वेळेसही अमेरिकेतील बहुतांश कंपन्यांनी धंद्याच्या दृष्टीने तिचा पूरेपूर लाभ उठवला होता. कार, टीव्ही, सेरेअल अशा वस्तू विकण्यासाठी चांद्रमोहिमेचा वापर करण्यात आला. आता 50 वर्षांनी हे प्रयत्न आणखी मोठ्या पातळीवर करण्यात येणार आहेत. कारण 1969च्या तुलनेत सध्या जागतिकीकरण व्यापक बनले आहे आणि देशोदेशींच्या बाजारपेठाही मोकळ्या झाल्या आहेत. चीन, ब्राझील व भारतासारखे देश तेव्हा विपन्नावस्थेत होते, आज त्यांच्या खिशात पैसा खुळखुळत आहे. म्हणूनच त्या चांद्रवीरांच्या बहादुरीच्या निमित्ताने या कंपन्यांनी आपली उत्पादने विकण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.

यातील प्रमुख कंपनी ओमेगा ही घड्याळाची कंपनी आहे. ओमेगा कंपनीला याबाबतीत जरा जास्तच अनुभव आहे कारण मूळच्या पहिल्या चांद्रमोहिमेत बझ ऑल्ड्रिनने घातलेले घड्याळ याच कंपनीचे होते. नासाने अंतराळात मनुष्याला पाठविण्याची योजना आखली तेव्हा तिने अनेक घड्याळांच्या चाचण्या घेतल्या. त्यात बाकीच्या कंपन्या अयशस्वी झाल्या आणि केवळ ओमेगाला यश आले. आता तेच यश पन्नास वर्षांनी परत वापरून घ्यायचे कंपनीने ठरविले असेल, तर ते फारसे वावगे म्हणता येणार नाही.

म्हणूनच कंपनीने 34,600 डॉलर किमतीचे मर्यादीत साठा असलेले ओमेगा स्पीडमास्टर हे मॉडेल सादर केले आहे. ही किंमत सोन्याच्या आवृत्तीसाठी असेल. त्याहून कमी किमतीचे म्हणजे 9,650 डॉलर किमतीचे ‘ओमेगा स्पीडमास्टर’ घड्याळ स्टेनलेस स्टीलचे असेल. त्यावर अंतराळ यानातून चंद्रावर उतरणाऱ्या ऑल्ड्रिन यांची लेसर किरणांनी कोरलली प्रतिमा असेल.

तसेच बीअरची कंपनी बडवाईजरने डिस्कव्हरी रिझर्व्ह नावाचे खास मद्य सादर केले आहे. त्यात 1960 च्या दशकातील कृतीनुसार बीअर केल्याचा दावा केला आहे आणि तिच्या पॅकेजवर सांकेतिकरीत्या 12 तारे असतील. अगदी छोट्याशा खेळण्यांची निर्माती असलेली लेगो कंपनीही मागे नाही. ही कंपनी नासा अपोलो 11 ल्यूनार लँडर सेट आणणार आहे.

फिशर ही कंपनी खास गुरुत्वाकर्षणरोधी पेन आणत आहे. याच कंपनीने 1969च्या मोहिमेत अंतराळवीरांना पेन पुरवल्या होत्या. त्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या फिशर स्पेस पेनची किंमत थोडीथोडकी नव्हे चक्क 700 डॉलर एवढी आहे.

या सगळ्या मोहिमांमध्ये जुन्या आठवणी जागवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येत आहे कारण लोकांना (अमेरिकेत) अंतराळ मोहिमांमध्ये फारसा रस राहिलेला नाही. माणूस चंद्रावर उतरला, या घटनेला पहिल्यांदा जेवढी प्रसिद्धी मिळाली, तिची जेवढी चर्चा झाली तेवढी अन्य कोणत्याही मोहिमांना मिळाली नाही. खुद्द अमेरिकेने 1972 मध्ये चंद्रावर मानवांना पाठविणे बंद केले. त्यामुळे त्या पहिल्या मोहिमेची जेवढी उजळणी करता येईल तेवढी कंपन्या करत आहेत.

चांद्रमोहिमेच्या संदर्भात कंपन्यांनी राबविलेल्या मोहिमांबाबत डेव्हिड मीर्मान स्कॉट या मार्केटिंग तज्ञाने ‘मार्केटिंग दि मून’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या मते, “1972 पासून माणसांनी अंतराळ प्रवास करणे हे खूप कंटाळवाणे झाले आहे. आपण पृथ्वीभोवती अनेक प्रदक्षिणा घातल्या आहेत आणि लोकांना आता त्यात फारसा रस राहिलेला नाही,” असे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र आता नासाने 2024 मध्ये पुन्हा चंद्रावर आणि 2030 मध्ये मंगळावर अंतराळवीरांना पाठविण्याची योजना आखली आहे. त्यामुळे मूळच्या चांद्रमोहिमेबद्दल लोकांमध्ये पुन्हा रस निर्माण झाला आहे. त्याचा लाभ घेणार नाहीत तर त्या अमेरिकी कंपन्या कसल्या?

Leave a Comment