सीहॉर्स – चिनी लोकांच्या भूकेसाठी लुप्त होणारा जीव


समुद्रात आढळणारा छोटासा जीव सीहॉर्स म्हणजे समुद्री घोडा. हा आहे एक प्रकारचा मासा मात्र त्याचे डोके घोड्यासारखे दिसते म्हणून त्याला सीहॉर्स म्हटले जाते. समुद्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी असलेला हा जीव आज संकटात आहे. नाहीसा होण्याच्या बेतात आहे आणि त्याला कारण आहे अवैध शिकार. पश्चिम आफ्रिकी देशांत आणि आग्नेय आशियात त्याची सातत्याने शिकार केली जात आहे, मात्र ती होत आहे चिनी लोकांची भूक भागवण्यासाठी.

सेनेगलच्या सागरी किनाऱ्यावर जिफर नावाचे छोटेसे खेडे आहे. हे खेडे मासेमारीसाठी प्रसिद्ध असून माशांच्या जगातील प्रमुख बाजारपेठांमध्ये त्याची ओळख आहे. येथेच अन्य माशांसोबत इवल्याशा परंतु महागड्या सीहॉर्सचीही बोली लावली जाते. सेनेगलच नव्हे तर पश्चिम आफ्रिकेतील बहुतांश देशांत सीहॉर्सच्या व्यापारात गेल्या काही वर्षांत तुफानी वाढ झाली आहे. सागरी जीवांच्या संरक्षणासाठी कार्यरत संस्था प्रोजेक्ट सीहॉर्सच्या माहितीनुसार, दरवर्षी सुमारे सहा लाख सीहॉर्सची निर्यात केली जात आहे. सीहॉर्सच्या काळ्या बाजारपेठेचे मूल्य वार्षिक जवळपास 18 अब्ज एवढे आहे.

या संस्थेतर्फे सेनेगलमध्ये काम करणारे आंद्रेस सिस्नेरोस यांनी डॉईट्शे वेलेला दिलेल्या माहितीनुसार, सीहॉर्सच्या तस्करीचे दोनच मार्ग आहेत आणि हे दोन्ही मार्ग आशिया व त्यातही चीनमधील सीफूडच्या व्यापाराशी जोडलेले आहेत. पश्चिम आफ्रिकेचा संपूर्ण सागरी व्यापार डकार येथूनच चालतो. डकार हे या भागातील सर्वात मोठे बंदर असून ते सीफूड व्यापाराचे केंद्र आहे. सीहॉर्सच्या बाबतीत नेमकी आकडेवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध नाही. तसेच या प्रजातीच्या माशांवर फारसे संशोधनही झालेले नाही. तो आकाराने एक इंचापेक्षाही कमी असतो आणि यातील काही जाती आपला रंगही बदलू शकतात. त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सजीवांच्या व्यापाराशी संबंधित एक करार 2016 मध्ये करण्यात आला होता. त्यात सीहॉर्सच्या व्यापाराला पूर्णपणे मनाई करण्यात आली होती. मात्र त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही. यावर्षीच्या सुरूवातीलाही त्याच प्रकारे सर्व तऱ्हेच्या सीहॉर्सच्या व्यापारावर पूर्ण बंदी घालण्यात आली. आतापर्यंत सीहॉर्सच्या सुमारे 40 हजार प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. दरवर्षी सुमारे 3 कोटी 70 लाख सीहॉर्स पकडले जातात. प्रोजेक्ट सीहॉर्सने याबाबत विविध देशांत संशोधन केले आहे. जगभरात सीहॉर्सच्या किमान 11 प्रजातींची संख्या 30 ते 50 टक्क्यांनी कमी झाल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे.

एका एनजीओच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 2009 ते 2017 पर्यंत सागरी जीवांच्या तस्करीत 24.4 टक्के वाटा सीहॉर्सच्या तस्करीचा होता. एका-एका कंटेनरमध्ये 20,000 सीहॉर्स असू शकतात. एका सीहॉर्सची किंमत 8.8 यूरो म्हणजेच सुमारे 700 रुपये असते. यातील बहुतांश तस्करी चीन व व्हिएतनामसाठी केली जाते.

चीनमध्ये सीहॉर्सचा वापर पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. ही औषधे दमा, निद्रानाश आणि हृदयविकारावर वापरली जातात. याशिवाय सीहॉर्समध्ये लैंगिक शक्ती वाढविण्याचे सामर्थ्य आहे, असेही मानले जाते.

आणखी एक मार्ग म्हणजे समुद्रात पकडलेल्या सीहॉर्सना जमिनीवर सुकवून त्यांचे पावडर केले जाते आणि हे पावडर राईस वाईन, चहा किंवा सूपमध्ये टाकून पिले जाते. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया यूनिव्हर्सिटीद्वारे प्रकाशित एका संशोधनानुसार, हाँगकाँगमध्ये सापडलेल्या अशा सुकविलेल्या सीहॉर्सपैकी 95 टक्के सीहॉर्स अशा देशांतून आणण्यात आले होते जिथे त्यांच्या शिकारीवर बंदी आहे. त्यात थायलंड हा प्रमुख देश होता. हाँगकाँग हे अशा सुकविलेल्या प्राण्यांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते.

“चिनी वैद्यकशास्त्रानुसार, सीहॉर्स पौष्टीक असतात आणि ते शरीराला ऊर्जा पुरवतात. वनौषधींसोबत मिसळून तसेच चहाप्रमाणे उकळून त्यांचा वापर दम्यावर उपचार करण्यासाठी करण्यात येतो,” असे युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या स्कूल ऑफ चायनीज मेडिसीनचे संचालक लिशिंग लाओ यांनी सीएनएनला सांगितले. अर्थात याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आणि याच्या वैद्यकीय चाचण्याही घेण्यात आलेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते काही असले तरी बेकायदेशीर मासेमारी आणि माणसांची अघोरी भूक भागविण्यासाठी एका जीवाच्या अस्तित्वावरच संकट आले आहे, हे खरे.

Leave a Comment