मुंबईतील रिमझिम पावसाची छायाचित्रे पाहून दिल्लीकरांना वाटत आहे हेवा


मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला असला, तरी दिल्लीमध्ये मात्र उकाडा कायम आहे. याच कारणास्तव दिल्लीकरांना सध्या मुंबईकरांचा हेवा वाटत आहे, आणि म्हणूनच आपल्या सोशल मिडीयावर मुंबईच्या रिमझिम पावसाची छायाचित्रे शेअर करण्यावरच दिल्लीकरांना समाधान मानावे लागत आहे. ही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर करून दिल्लीमध्येही असाच पाऊस लवकर कोसळावा आणि दिल्लीकरांची उकाड्यातून सुटका व्हावी अशी आशाही दिल्लीकर आपल्या पोस्ट्सच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत.


गेल्या आठवड्याभरात दिल्लीमध्ये पाऱ्याने उच्चांकी तापमान गाठले असून, कडक उन्हाने आणि उष्म्याने दिल्लीकर हैराण झाले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीमध्ये पावसाच्या सारी बरसतील असा अंदाज जरी हवामान खात्याने व्यक्त केला असला, तरी जोपर्यंत प्रत्यक्षात वरुण राजाचे आगमन होत नाही, तोवर तरी मुंबईतील रिमझिम पावसाची छायाचित्रे शेअर करण्यातच दिल्लीकरांनी समाधान मानून घेतल्याचे दिसत आहे. दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात कमाल तापमान चाळीस अंशावर स्थिरावले होते, तर किमान तापमानही तीस अंशांच्या घरात होते.


मुंबईमध्ये पावसाची रिमझिम जरी दिल्लीकरांना हवीशी वाटत असली, तरी मुंबईकरांचे मात्र पावसाच्या संततधारेमुळे हाल होत आहेत. अनेक भागांमध्ये पाणी साठले असून, लोकल्स आणि बसेस उशीराने धावत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Leave a Comment