तुंबापुरी झालेल्या मुंबापुरीच्या निमित्ताने पुन्हा व्हायरल झाले मलिष्काचे गाणे


बृह्नमुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी पालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरू असल्याचे दाखवण्यासाठी आरजे मलिष्का आणि अभिनेते अजिंक्य देव यांना सोबत घेऊन वरळी येथील महापालिकेच्या लव्हा‍ग्रोव्ह पंपिंग स्टेशनला भेट दिली होती. तसेच महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाची या दोघांनाही ओळख करून देण्यात आली होती. पण सध्या मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे पालिकेचे सर्व दावे फोल ठरल्याचे आता चित्र समोर आले आहे.

त्याचनिमित्ताने तुंबलेल्या मुंबईवर आरजे(रेडिओ जॉकी) मलिष्काने केलेले गाणे पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलिष्काने या गाण्यातून मुंबईतील खड्ड्यांची स्थिती आणि सामान्यांच्या समस्या मांडल्या आहेत. हिंदी आणि मराठी भाषेत बनवलेले हे गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. महापालिका प्रशासन मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर कसे हतबल होते. याची परिस्थिती या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न मलिष्काने केला आहे.


मलिष्काने हा व्हिडीओ ट्विटरवरही शेअर केला होता. या गाण्याला मलिष्काने ‘मॉन्सून साँग विद मलिष्का’ असे नाव दिले असून, हे गाणे सैराटच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर तयार केले आहे. या गाण्यातून मलिष्काने मुंबई प्रशासन आणि सरकारचे वाभाडे काढल्याचेही पाहायला मिळत आहे. मलिष्काने या गाण्यातून मुंबईत मुसळधार पावसानं होणाऱ्या परिस्थितीवर बोट ठेवले आहे.

Leave a Comment