या खुर्चीवर बसणारा पडतो मृत्यूमुखी !


आजचे जग जरी विज्ञानाचे असले, तरी या जगामध्ये शापित, झपाटलेल्या अनेक वस्तू असल्याचे मानणारे लोकही कमी नाहीत. या वस्तूंच्या संपर्कात येणाऱ्या मनुष्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडून क्वचित कोणी मृत्यूमुखीही पडत असल्याच्या मान्यता अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. त्यापैकीच एक वस्तू इंग्लंडमधील थर्स्क शहरामध्ये असलेल्या वस्तूसंग्रहालयामध्ये पहावयास मिळते. या वस्तूसंग्रहालयामध्ये असलेली एक ‘स्टूप चेअर’ म्हणजेच बुटकी लाकडी खुर्ची शापित असल्याचे म्हटले जाते. या खुर्चीला ‘द डेड मॅन्स चेअर’ या नावानेही संबोधले जात असून, १७०२ साली थॉमस बस्बी नामक एका खुन्याला फाशीही शिक्षा होण्यापूर्वी त्याने या खुर्चीला शाप दिला असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर जो मनुष्य त्या खुर्चीवर बसला, तो मनुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे मृत्युमुखी पडला असल्याने ही खुर्ची शापित असल्याचे म्हटले जाऊ लागले.

थॉमस बस्बी याला १७०२ साली त्याच्या सासऱ्यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. आरोप सिद्ध झाल्यानंतर बस्बीला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली. जेव्हा बस्बीला अटक करण्यात आली, तेव्हा बस्बी एका पबमध्ये याच खुर्चीवर बसला असल्याचे म्हटले जाते. पोलीस बस्बीला घेऊन जात असताना त्याने या खुर्चीला शाप दिला. त्यानंतर बस्बीला ज्या ठिकाणी फासावर लटकविण्यात आले, त्या ठीकाणाच्या जवळच असलेल्या हॉटेलचे नामकरण ‘बस्बी स्टूप इन’ असे करण्यात आले असून, ज्या ठिकाणी बस्बीला फाशी देण्यात आली, त्या ठिकाणी बस्बीचा आत्मा पाहिल्या गेल्याच्या अनेक कथाही सांगितल्या जातात.

त्यानंतर त्या पबमध्ये गेलेल्या ज्या व्यक्ती त्या विवक्षित खुर्चीवर बसल्या त्यांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू झाला. अखेरीस १९७८ साली थर्स्क वस्तूसंग्रहालयामध्ये ही खुर्ची पाठविण्यात आली, आणि या खुर्चीवर कोणाला बसता येऊ नये यासाठी ही खुर्ची वस्तूसंग्रहालयाच्या छताच्या जवळ लटकविण्यात आली. बस्बीची ही खुर्ची साधारण १८४० सालच्या आसपासची असून, सुमारे १३८ वर्षे जुनी असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment