भारतीय निर्बंधांमुळे कडू झाले अमेरिकी बदाम


भारतीय आयातीत वस्तूंवर शुल्कमाफी रद्द करून अमरिकेने गेल्या महिन्यात एका व्यापारयुद्धाला तोंड फोडले. त्यावर प्रत्युत्तरादाखल भारतानेही कारवाई करून अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क वाढविले. त्याची झळ आता अमेरिकेतील बदाम उत्पादकांना बसत असून त्यांच्या दृष्टीने बदाम कडू झाले आहेत.

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारताचा ‘जनरलाईज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरेन्स’ (जीएसपी) हा दर्जा रद्द केला होता. अमेरिकेचा हा व्यापारी कार्यक्रम असून त्या अंतर्गत अमेरिका भारतासारख्या विकसनशील देशांच्या आर्थिक विकासासाठी मदत करत असे. या दर्जामुळे भारताला आतापर्यंत सर्वाधिक फायदा होत असे आणि दरवर्षी भारतातून 5.6 अब्ज डॉलरची निर्यात होत असे. त्यावर कोणतेही शुल्क लागत नसे.

त्याला उत्तर म्हणून काही दिवसांनी अमेरिकेतून आयात होणाऱ्या 29 वस्तूंवरचे शुल्क वाढविले होते. त्यात बदामाचाही समावेश होता. बदामाच्या बाबतीत अमेरिकेचा जवळजवळ एकाधिकार असून जगभरात बदामाच्या एकूण निर्यातीत एकट्या कॅलिफोर्निया प्रांताचा 82 टक्के वाटा आहे. सुमारे 7,000 उत्पादक बदामाची शेती करतात. अल्माँड बोर्ड ऑफ अमेरिका संस्थेच्या अंदाजानुसार, या उद्योगामुळे कॅलिफोर्नियात एक लाखापेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतात. आता बदामावर भारताने लावलेल्या शुल्कामुळे या सर्वांवर असर होण्याची भीती तेथील उद्योजकांना आहे. अल्माँड बोर्डाने नवी दिल्लीत आपले कार्यालय उघडले आहे. त्याचे जाहिरातीचे वार्षिक बजेट 60 लाख डॉलरचे आहे.

एवढेच नव्हे तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ हे गेल्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर आले होते. ही भेट मुख्यतः इराणवरील निर्बंधांबाबत आहे, असे सांगण्यात आले. मात्र कॅलिफोर्नियाच्या एका संसद सदस्याने त्यांना बदामावरील शुल्काचा मुद्दा भारतीय अधिकाऱ्यांकडे उपस्थित करण्याची मागणी केली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे बदाम भारतात निर्यात केले जातात. त्यावरचा वाढीव आयात कर रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे अमेरिकी काँग्रेस सदस्य जोश हार्डर यांनी पॉम्पिओ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. यावरून या बदाम उत्पादकांसाठी भारत किती महत्त्वाचा देश आहे याची कल्पना येईल.

नव्या शुल्कामुळे सोललेल्या बदामांची किंमत पाऊंडमागे 12 सेंटने म्हणजेच 20 टक्क्यांनी वाढेल. बिन सोललेल्या बदामांची किंमतही सुमारे 17 टक्क्यांनी वाढेल. “पाहायला गेलो तर हा आकडा खूप मोठा वाटत नाही मात्र आमच्या निर्यातीसाठी चीनशिवाय भारत हाच एक मुख्य पर्याय होता,” असे अल्माँड बोर्डाच्या अध्यक्षा जूली अॅडम्स यांनी सांगितले. या शुल्कांच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करणे चिंतादायक आहे, असे त्या म्हणतात.

त्यातच भर म्हणजे अमेरिकेने चीनसोबत सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे तेथेही हाच प्रकार घडला आहे. गेल्या वर्षी बदामावर चीननेही आयात शुल्क वाढविले होते. त्यावेळी बदाम उत्पादकांना मोठा फटका बसला होता कारण चीनने अमेरिकी बदामांवर 50 टक्के शुल्क लावले होते. अल्माँड बोर्डाच्या माहितीनुसार, ते शुल्क वाढल्यानंतर अमेरिकेतून चीनला होणाऱ्या निर्यातीत एक तृतीयांश घट झाली आहे.

“आम्ही एखाद्या देशातील बाजारपेठेतील समस्या हाताळू शकतो मात्र अनेक देशांमध्ये असे होत असेल तर त्यावर मार्ग काढणे एक आव्हान बनते,” असे अमेरिकेतील ट्रॅव्हेले अँड फिपेन इंक या कंपनीचे डेव्हिड फिपेन यांनी असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेला सांगितले. ही कंपनी बदामांचे उत्पादन आणि प्रक्रियेचे काम करते. अमेरिकेतून 2017-18 मध्ये भारतात सुमारे 65 कोटी डॉलर किमतीच्या बदामांची निर्यात झाली होती. त्याच वर्षी चीन आणि हाँगकाँगला सुमारे 54.9 कोटी डॉलरच्या बदामांची निर्यात झाली होती. याचाच अर्थ भारतातून मागणी कमी झाली तर अमेरिकी बदाम उत्पादकांना जास्त फटका बसू शकतो.

याचे पडसाद भारतातही उमटणार आहेत. भारतात बदामांची निर्यात कमी झाली तर बाजारात ते कमी उपलब्ध होतील. त्यामुळे बदाम आणखी महाग होतील. यामुळे अनेक जण बदाम विकत घेणेच सोडून देतील, अशी भारतीय विक्रेत्यांना भीती आहे. भारतात बदाम मुख्यतः काश्मीरात पिकविला जातो. त्याच्या लागवडीखाली 2400 हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 5600 क्विंटल बदामाचे उत्पादन होते. हिमाचल प्रदेशात 200 हेक्टरात बदामाचे पीक काढतात आणि उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सुमारे 5000 हेक्टरात अक्रोड व बदाम यांची लागवड केली आहे. अर्थातच देशातील मागणीच्या दृष्टीने हे उत्पादन अपुरे आहे. त्यामुळे आधीच महागडे असलेले बदाम घेण्यासाठी आणकी किंमत मोजण्याची तयारी ठेवायला हवी.

Leave a Comment