तापलेला सूर्य गिळणार ८ कोटी रोजगार!


यंदाचा मोसमी पाऊस आपला रंग दाखवू लागला असून विविध भागांत तो बऱ्यापैकी बरसत आहे. अर्थात या पावसासाठीही लोकांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. जो पाऊस झालाय त्याचे प्रमाणही तसे कमी आहे. बदलत्या हवामानामुळे देशात आणि जगातही पावसाचा लहरीपणा वाढला आहे. एकीकडे आपल्या देशात पावसाचे आगमन झाले असताना युरोप उष्णतेने विव्हळतोय. जर्मनीत तर जून महिन्यातील आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक तपमानाची नोंद झाली आहे.

भारतीय लोकांना उष्णता नवी नाही. आपले शेतकरी आणि कामगारही तळपत्या सूर्याखाली शेतात किंवा कारखान्यात काम करण्यास सराईत झालेले असतात. मात्र युरोपमधील लोकांना व कामगारांना आजवर ऊष्मा हा अनोळखी प्रकार होता. युरोपमधील बहुतेक कामगार कमालीच्या उष्णतेला सरावलेले नसतात. आता त्यांना वाढत्या तपमानाशी जुळवून घ्यावे लागत आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण युरोपात युरोपमध्ये 40 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आणि हा खंड कासावीस झाला. त्याची उत्पादकता कमी झाली.

आता तर संयुक्त राष्ट्रांच्या कामगार संघटनेनेही येणाऱ्या अंधकारमय भविष्याची कल्पना दिली आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या (आयएलओ) एका नवीन अहवालानुसार, जगभरातील हवामानबदलामुळे, म्हणजेच तपमानवाढीमुळे, येत्या काळात ८ कोटी रोजगार नष्ट होणार आहेत! “वर्किंग ऑन अ वॉर्मर प्लॅनेट – दि इम्पॅक्ट ऑफ हीट स्ट्रेस ऑन लेबर प्रॉडक्टिव्हिटी अँड डिसेंट वर्क” नावाच्या अहवालात हा इशारा देण्यात आला आहे.

वातावरणातील बदलांशी संबंधित उष्मा ताणामुळे 2030 सालापर्यंत ८० कोटी पूर्णवेळ नोकऱ्यांच्या बरोबरीने उत्पादकता कमी होईल, असे त्यात म्हटले आहे. निव्वळ पैशांच्या भाषेत बोलायचे झाले तर एवढे रोजगार कमी होणे याचा अर्थ जागतिक अर्थव्यवस्थेला 2.4 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा तोटा होणे!

शरीराला अपाय न होता माणूस जी उष्णता सहन करू शकतो त्याला उष्मा ताण (हीट स्ट्रेस) असे म्हटले जाते. सामान्यतः कामाच्या ठिकाणी 35 अंशांपेक्षा जास्त तपमान हे अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम करू शकते.

शास्त्रज्ञांच्या मते, 2100 सालापर्यंत जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची वाढ होईल. तो अंदाज गृहीत धरून अहवालात म्हटले आहे, की 2030 सालापर्यंत एवढी वाढ झाली तर संपूर्ण जगभरातील कामकाजाचे तास 2.2 टक्क्यांनी कमी होईल. मात्र हा अंदाज सुद्धा अगदीच कमी आहे. कारण अलीकडच्या आकडेवारीनुसार, हा 1.5 अंश सेल्सिअसचा आकडा अत्यंत कमी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजानुसार या शतकाच्या अखेरपर्यंत तपमानाची वाढ 3-5 अंशांनी वाढू शकते. मग त्या परिस्थितीत काय हाल होतील, याचा अंदाज केलेलाच बरा.

या बदलाचा सर्वाधिक फटका शेती व बांधकाम क्षेत्राला बसेल, मात्र त्यातही शेतीवर त्याचा सर्वाधिक वाईट परिणाम होईल. जगभरात जवळजवळ 1 अब्ज लोक शेतीमध्ये काम करतात आणि 2030 पर्यंत जे रोजगार हरवतील त्यातील 60 टक्के रोजगार हे शेतीतील असतील, असे हा अहवाल सांगतो. बांधकाम क्षेत्रातील लाखो नोकऱ्या जातील आणि त्या क्षेत्रावरही प्रचंड परिणाम होईल. धोक्याच्या पट्ट्यात असलेल्या अन्य क्षेत्रांमध्ये पर्यावरणाशी संबंधित वस्तू व सेवा, कचरा संकलन, आणीबाणी सेवा, दुरुस्तीची कामे, वाहतूक, पर्यटन, क्रीडा आणि काही प्रकारचे औद्योगिक काम यांचा समावेश आहे.

आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे रोजगारांच्या या हानीचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. त्यात दक्षिण आशिया आणि पश्चिम आफ्रिका या भागांवर सर्वात वाईट परिणाम होतील. केवळ या दोन भागांमध्येच ५ कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या किंवा त्यांच्याशी समान उत्पादनक्षमता हरवून जाणार आहेत. “कमी आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अधिक असमानता पाहायला मिळेल आणि सर्वात कमकुवत लोकांसाठी कामाची परिस्थिती आणखी वाईट होण्याची तसेच लोकांच्या विस्थापनाची आपण अपेक्षा करू शकतो,” असे आयएलओच्या संशोधन विभागाच्या प्रमुख कॅथेरिन सॅगेट म्हणतात.

अशी सगळी निराशाजनक स्थिती असली तरी यावर उपाय उपलब्ध आहेत. हीट स्ट्रेसचे धोके आणि त्यांचा कामगारांवर होणारा परिणाम याची हाताळणी करण्यासाठी सरकारांनी कारवाई करावी. या नवीन वास्तवाशी जुळवून घेण्याकरिता योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे या अहवालात सुचवले आहे.

जागतिक तपमानवाढ हा सर्वत्र चिंतेचा विषय ठरला आहे. मात्र आतापर्यंत त्याचे परिणाम हे पर्यावरणाच्या अन्य घटकांशी संबंधित होते. आता प्रत्यक्ष माणसांच्या रोजगाराशी म्हणजेच उदरनिर्वाहाशी तिचा संबंध जोडला जात आहे. तापलेला सूर्य गिळणार ८ कोटी रोजगार तयारीत आहे. त्याचा हा प्रकोप शांत करणे हे मानवजातीसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.

Leave a Comment