जगन्नाथ मंदिरामध्ये असलेल्या देवतांच्या मूर्तींचे निर्माण का राहिले अपुरे ?


भारतामधील अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ पुरी हे महत्वाचे क्षेत्र आहे. चारधाम यात्रा करताना या क्षेत्री दर्शनाला आल्याखेरीज चारधाम यात्रा सफल होत नाही असे ही म्हटले जाते. ओडिशा राज्यातील पुरी या ठिकाणी असलेले जगन्नाथ मंदिर वैष्णव संप्रदायासाठी महत्वाचे धर्मक्षेत्र असून, त्या ठिकाणी जगन्नाथाच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत. जगन्नाथ पुरी क्षेत्राला धरतीवरील वैकुंठ म्हणूनही संबोधण्यात येते. तसेच या स्थानाचा उल्लेख शाकक्षेत्र, नीलांचल, आणि नीलगिरी म्हणूनही केला जातो. पुराणांच्या अनुसार पुरी क्षेत्री भगवान श्रीकृष्णांनी अनेक लीला केल्या असून, या ठिकाणी ‘नीलमाधव’ म्हणून कृष्ण अवतरले असल्याची मान्यता रूढ आहे. ज्याप्रमाणे द्वारकेतील मंदिर समुद्रकिनारी आहे, त्याचप्रमाणे पुरीचे मंदिर देखील समुद्र किनाऱ्याजवळ उभे आहे.

पुरीच्या मंदिरामध्ये जगन्नाथ रूपी कृष्ण आपले थोरले बंधू बलभद्र आणि भगिनी सुभद्रा यांच्यासह विराजमान आहेत. या तीनही देवतांच्या प्रतिमा काष्ठाने बनेलेल्या असून, दर बारा वर्षांनी या मूर्ती बदलल्या जाण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. या परंपरेच्या अनुसार दर बारा वर्षांनी आधीच्या मूर्ती विसर्जित करून पवित्र वृक्षाची लाकडे वापरून नव्या मूर्ती तयार केल्या जातात आणि त्यांची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते. वेदांच्या अनुसार भगवान बलभद्र ऋग्वेदाचे प्रतीक म्हणून तर श्रीकृष्ण सामवेदाचे प्रतीक म्हणून, सुभद्रा यजुर्वेदाचे प्रतीक म्हणून आणि कृष्णाच्या हाती असलेले सुदर्शन चक्र अथर्ववेदाचे प्रतीक म्हणून या मंदिरामध्ये विराजमान आहेत.

पुरीच्या मंदिराचे निर्माणकार्य कलिंग राजा अनंतवर्मन चोडगंगदेव यांनी सुरु करविले होते. ११९७ साली ओडिया शासक अनंगभीमदेव यांच्या शासनकाळामध्ये या मंदिराला वर्तमान स्वरूप दिले गेले. मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रत्नमंडित पाषाणाच्या ओट्यावर स्थापित आहेत. या मूर्तीच्या पूजा अर्चा मंदिराचे निर्माण होण्याच्या आधीपासूनच केली जात असल्याचे म्हटले जाते. कलिंग शैलीमध्ये बनविले गेलेले हे मंदिर भारताच्या भव्यतम मंदिरांपैकी एक समजले जाते. जगन्नाथ पुरी येथील मुख्य मंदिर वक्राकार असून, याच्या शिखरावर अष्ट धातूंनी बनविलेले सुदर्शन चक्र विराजमान आहे. यालाच नीलचक्र म्हणूनही संबोधले जाते. या मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये अनेक लहानमोठी इतर मंदिरेही आहेत, ज्यांतील विमला देवी मंदिराचा समावेश शक्तीपीठांमध्ये केला जातो.

जगन्नाथ पुरीच्या मुख्य मंदिरामध्ये विराजमान असलेल्या तीनही देवतांच्या मूर्तींचे निर्माण अपुरे राहिले असून, असे का घडले असावे यामागे एक आख्यायिका आहे. या आख्यायिकेच्या अनुसार जेव्हा विश्वकर्मा एका वृद्ध मूर्तिकाराच्या रूपात मूर्तींचे निर्माण करण्यास आले, तेव्हा राजा इंद्रद्युम्नासमोर त्यांनी एक अट ठेवली. मंदिरातील मूर्तींचे निर्माण करताना दरवाजा बंद असेल आणि जोपर्यंत मूर्तींचे निर्माण पूर्ण होत नाही तोवर कोणीही दरवाजे उघडून आत येऊ नये अशी ही अट होती. बंद दरवाज्याच्या मागे मूर्तीचे निर्माण कार्य सुरु आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी राज इंद्रद्युम्न दररोज मंदिराच्या दाराला कान लावून कानोसा घेत असे. मूर्ती घडविताना येत असणारे आवाज ऐकून मूर्तींचे निर्माणकार्य सुरु असल्याची खात्री राजाला पटत असे.

एक दिवस राजा मंदिराच्या दरवाजाशी उभे राहून कानोसा घेत असता, आतून कोणताच आवाज राजाच्या कानी पडेना. त्यामुळे विश्वकर्मा मूर्ती घडविण्याचे काम सोडून निघून तर गेले नाहीत ना, अशी शंका राजाच्या मनामध्ये आली. आपल्या शंकेचे निरसन करून घेण्यासाठी राजाने मंदिराचे द्वार उघडले आणि तत्क्षणी आतमध्ये असलेले मूर्तिकाररूपी विश्वकर्मा अदृश्य झाले. त्यामुळे ते घडवीत असलेल्या मूर्ती अपुऱ्याच राहिल्या. तेव्हापासून याच रूपामध्ये या मूर्ती इथे विराजमान असल्याची मान्यता रूढ आहे.

Leave a Comment