क्रांतिकारी वळणावर काँग्रेस?


देशात मोसमी पाऊस आला आहे आणि काही ठिकाणी दमदार पाऊसही कोसळत आहे. मात्र त्या पावसापेक्षाही जास्त संततधार काँग्रेसमधील राजीनाम्यांनी लावली आहे. आतापर्यंत 150 पेक्षा जास्त नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी निश्चित व्हायला मदत होणार असली, तरी पुढे काय होणार हा प्रश्न तेवढाच आ वासून उभा आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. पक्षातील अन्य नेत्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना राजीनाम्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा राजीनामा निलंबित ठेवण्यात आला. मात्र राहुल हे आजही आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. इतकेच नव्हे तर गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पुढचा अध्यक्ष बनू नये, यावरही ते आग्रही आहेत. पक्षातील अन्य नेत्यांनीही आपापल्या पातळीवर पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी त्यांची इच्छा होती.

गेल्या आठवड्यात युवक काँग्रेसचे काही नेते राहुल यांच्या निवासस्थानाबाहेर एकत्र आले होते. राहुल यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त करावे, अशी त्यांची योजना होती. झाले उलटेच. राहुल यांनी त्यांना घरात बोलावले आणि आपल्या मनातील सल बोलून दाखवली. माझ्या राजीनाम्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्री, सरचिटणीस किंवा प्रदेश अध्यक्षाने पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला नाही, असे त्यांनी बोलून दाखवले. “एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. आता मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष राहणार नाही. तुम्ही चिंता करू नका. मी कुठेही जाणार नाही. मी येथेच राहणार आहे आणि तुमच्यासोबत आपल्या सर्वांची लढाई लढेल. आज मी निवडणूक हरलो आहे. एक बोट कोणाकडे दाखवले तर तीन बोटे माझ्याकडे असतील, ” या शब्दांत राहुल यांनी आपले दुःख व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेणे आतापर्यंत टाळणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची वागणूक राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर बदलली. काँग्रेस सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्यासहित ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी आणि विविध राज्यांतील नेत्यांनी राजीनामे द्यायला सुरूवात केली. आतापर्यंत 150 काँग्रेस नेत्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. राहुल यांच्या वक्तव्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी राजीनामे देऊ केल्याने ज्येष्ठांवरही दबाव आला.

आता हे वर्तुळ पूर्ण झाले म्हणजे राहुल यांचा राजीनामा पुन्हा मंजुरीसाठी येईल. त्यांचे पद सांभाळण्यासाठी अनेक इच्छुकांची नावे माध्यमांमधून समोर आली आहेत. मात्र त्यातील कोणीही प्रेरक किंवा चैतन्यदायी असल्याचे वाटत नाही.

राहुल यांनी लोकसभा निवडणुकीनंतर दोन दिवसांनी, 25 मे, रोजी काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत राजीनामा देण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आपला पर्याय शोधण्याची सूचना केली होती. राहुल यांच्या या भूमिकेला सोनिया व प्रियंका गांधी या दोघींचाही पाठिंबा असल्यामुळे काँग्रेसपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. मात्र एक महिन्यानेही त्यांच्या दृष्टिकोनात बदल झालेला नाही, ही कौतुकाचीच गोष्ट म्हणायला पाहिजे. राहुल यांची ती कृती केवळ एक नाटक नव्हते हे सिद्ध झाले आहे. नेहमीप्रमाणे लोकांच्या आग्रहामुळे ते आपला राजीनामा मागे घेतील, अशी टीकाकारांची अटकळ होती. ती राहुल यांनी आपल्या कृतीने खोटी ठरविली आहे.

काँग्रेसमध्ये होणारा हा बदल सकारात्मक म्हणायला हवा. कारण कारण गांधी कुटुंबातील सदस्यांनार कोणत्याही प्रकारचा दोष देण्याची प्रथा काँग्रेसमध्ये नाही. गांधी कुटुंबीय कुठलीही चूक करू शकत नाहीत, ते अपयशी होऊ शकत नाहीत असा काँग्रेसचा आजवरचा रिवाज आहे. काही चांगली गोष्ट घडली किंवा यश मिळाले तर ते काँग्रेस अध्यक्षामुळे आणि प्रतिकूल गोष्ट घडली असेल किंवा पराभव झाला असेल तर त्याची जबाबदारी गांधी कुटुंबीय सोडून अन्य नेत्यांची असा पायंडा आहे.

हे सर्व चित्र बदलवून काँग्रेसचे लोकशाहीकरण करण्याबद्दल आपण गंभीर आहोत, हे राहुल दाखवून दिले आहे. गेली अनेक दशके घराणेशाहीचा आरोप झेलणाऱ्या काँग्रेसच्या दृष्टीने ही क्रांतिकारी घटना आहे. आता त्यांनी आपली ही भूमिका कायम ठेवून पक्षाला एक प्रकारे नव्या वळणावर आणले आहे. या वळणावरून पक्षाला त्यांनी पुढे नेले तर पराभवाचेही परिमार्जन होईल.

Leave a Comment