नीता अंबानींची हिरेजडीत हँँडबॅग तब्बल २.६ कोटींची !


सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या ‘एर्मेस हिमालया बर्किन’ बॅगची छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या हँडबॅगची किंमत तब्बल २.६ कोटी रुपये असून, या बॅगवर दोनशेहूनही अधिक हिरे जडविलेले आहेत. सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या गेलेल्या छायाचित्रामध्ये नीता अंबानी, बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करीना कपूर खान यांच्या समवेत उभ्या असलेल्या दिसत असून, नीता अंबानी यांच्या हातामध्ये ही हिरेजडीत हँडबॅगही पहावयास मिळत आहे.

क्रिस्टीज् डॉट कॉम (christies.com) या वेबसाईटच्या अनुसार ‘एर्मेस हिमालया बर्किन’ ही हँडबॅग, ही सर्व क्लासिक ब्रँडेड हँडबॅग्जच्या कलेक्शनमध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वाधिक किंमतीच्या बॅग्ज पैकी एक समजली जाते. या हँडबॅगवर दोनशे चाळीसपेक्षा अधिक हिरे जडविलेले असून, याची बकल्स आणि इतर हार्डवेअर अठरा कॅरट सोन्याने तयार करण्यात आले आहे. २०१७ साली क्रिस्टीज् च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लिलावामध्ये ‘हिमालया क्रोकोडाईल डायमंड’ बॅग ३७९,२६१ डॉलर्सला विकली गेली होती. एखाद्या हँडबॅगला आजवर मिळालेली ही विक्रमी किंमत असल्याचे क्रिस्टीज् च्या वतीने सांगण्यात आले होते.

‘हिमालया बर्किन’ बॅग्ज, नाईल नदीमध्ये सापडणाऱ्या मगरींच्या कातड्यापासून तयार करण्यात येत असून, अभिनेत्री आणि गायिका असलेल्या जेन बर्किन यांच्या नावावरून या बॅगला ‘बर्किन’ हे नाव देण्यात आले आहे. बर्किन बॅग्ज नेहमीच त्यांची विक्रमी किंमत आणि या बॅग्ज आवर्जून खरेदी करणाऱ्या सेलिब्रिटीज, यामुळे चर्चेचा विषय ठरत आल्या आहेत.

Leave a Comment