गेली बावीस वर्षे यांचा आहे वाळूच्या किल्ल्यामध्ये मुक्काम


ब्राझिलचा निवासी असलेला मार्सियो मिझाइल माटोलीयास याला आपल्या राहत्या घरासाठी ना कधी भाडे भरावे लागले, ना कधी विजेचे किंवा पाण्याचे बिल भरावे लागले, पण तरीही गेली बावीस वर्षे मार्सियो, रियो डे जनेरोमधील, ‘बार्रा द तिजूका’ नामक आलिशान रहिवासी भागामध्ये असलेल्या बीचवर वास्तव्य करून आहे. मार्सियो गेली बावीस वर्षे, त्याने स्वतःच तयार केलेल्या एका भल्या मोठ्या वाळूच्या किल्ल्यामध्ये वास्तव्य करून असल्याने आजवर त्याला आपल्या या आगळ्या वेगळ्या घरासाठी फारसे पैसे खर्च करण्याची वेळच आलेली नाही.

चव्वेचाळीस वर्षीय मार्सियो वीस वर्षांहून अधिक काळ या वाळूच्या किल्ल्यामध्ये राहत असल्याने स्थानिक लोक त्याला ‘किंग मार्सियो’ म्हणून संबोधतात. बार्रा द तिजुका मधील सागरी किनाऱ्यावर मार्सियोने आपला ‘राजमहाल’ बनविला असून, त्या किल्ल्याच्या बाहेरच त्याने स्वतःसाठी सिंहासन देखील बनविले आहे. अनेकदा प्लास्टिकचा मुकुट घालून सिंहासनावर बसलेला मार्सियो, त्याच्या समोरील अथांग समुद्राचे दृश्य न्याहाळत असताना पहावयास मिळतो. रियो द जेनेरोच्या बीचेसवर अनेक सुंदर वाळूचे किल्ले नेहमीच पहावयास मिळत असतात. येथे येणारे पर्यटक या किल्ल्यांच्या सोबत छायाचित्रे काढण्यासाठी पैसे देऊ करत असल्याने अनेक स्थानिक लोक येथील बीचेसवर आकर्षक किल्ले उभारीत असतात. मात्र स्वतःला राहण्यासाठी वाळूचा किल्ला बनविणारा मार्सियो हा पहिलाच मनुष्य आहे. रियो द जेनेरो मधील आलिशान रहिवासी भागांमध्ये स्वतःचे घर घेणे तर दूरच, पण लहानशा घराचे भाडे देखील सामान्य माणसाला परवडण्यासारखे नसल्याने वाळूचा किल्ला तयार करून त्यात राहण्याचा निर्णय घेतल्याचे मार्सियो म्हणतो. समुद्रकिनारी घर बांधण्यासाठी लोक अमाप पैसे खर्च करीत असतात, पण आपल्याला मात्र समुद्रकिनाऱ्यावर राहण्यासाठी अजिबात पैसे खर्च करावे लागले नसल्याचेही मार्सियो गंमतीने म्हणत असतो.

मार्सियोने बांधलेल्या किल्ल्याच्या भिंती ढासळू नयेत यासाठी या वाळूच्या भिंती सतत ओल्या राहतील याची काळजी मार्सियो घेत असतो. तसेच जर जोराचे वादळ आले, तर मार्सियोचा हा आशियाना झटक्याने कोसळूनही जातो. अश्या वेळी हा किल्ला पुन्हा नव्याने उभारणे एवढाच एक पर्याय मार्सियोसमोर उरतो. तरीही गेली बावीस वर्षे याच पद्धतीने राहणे मार्सियोला मनापासून आवडते. वाळूचे किल्ले बनविण्याचे मार्सियोचे कसब स्थानिक लोकांच्या परिचयाचे झाले असल्याने अनेक मॉल्समध्ये वाळूच्या सुंदर प्रतिकृती बनविण्यास मार्सियोला आमंत्रित केले जात असते. वाळूचे सुंदर किल्ले बनविण्याचे कौशल्य मर्सियोने आपल्या मित्राच्या मदतीने शिकून घेतले असून, त्याने या बद्दलच्या अनेक पुस्तकांचाही अभ्यास केला असल्याचे समजते.

या किल्ल्यामधे असलेल्या बत्तीस चौरस फुटांच्या बेडरूममध्ये मार्सियोने अनेक पुस्तके ठेवलेली आहेत, तर जवळच असलेल्या एका ‘शॅक’मध्ये मार्सियोची स्नानाची व्यवस्था आहे. किंग मार्सियो आणि त्याचा वाळूचा किल्ला पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत असून, अनेक पर्यटक त्याची छायाचित्रे टिपण्यासाठी आवर्जून या बीचवर येत असतात.

Leave a Comment