जाणून घेऊ या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांच्याविषयी


इव्हाना ट्रम्प यांनी आपण आता पुनश्च ‘सिंगल’ असल्याचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. इव्हाना, इव्हांका, एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर यांच्या आई असून, रोसानो रुबीकोंडी या आपल्या मित्रासोबत ‘कभी हां, कभी ना’ प्रकारात मोडणारे आपले प्रेमसंबंध आता संपुष्टात आल्याचे इव्हाना यांनी आपल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. आपण आता पुनश्च सिंगल असून आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्यास मोकळे असल्याचेही इव्हाना यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे. तसेच आपल्या ऐषारामी जीवनशैलीसाठी इतर कोणावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून नसून आपले सर्व खर्च आपण स्वतः भागवीत असल्याचेही इव्हाना यांनी म्हटले आहे. इव्हाना आणि रोसानो गेली पंधरा वर्षे एकमेकांच्या सोबत असून, त्यांनी विवाह केला होता. मात्र कालांतराने त्यांचे पटेनासे झाल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला, तरी आजही ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे इव्हाना म्हणतात.

इव्हाना आणि अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कैक वर्षांपूर्वी वेगळे झाले असले, तरी आजही आपल्यात वरचेवर फोनवर संभाषण होत असल्याचे इव्हाना म्हणतात. डोनाल्ड यांनी इव्हाना यांचा अनेक बाबतीत सल्ला ही घेतला असल्याचे सांगून चेकोस्लोव्हेकियाच्या राजदूत म्हणून काम करण्याबद्दलही डोनाल्ड यांनी विचारणा केली असल्याचे इव्हाना म्हणतात. इव्हाना स्वतः चेकोस्लोव्हेकियाच्या निवासी असल्याने डोनाल्ड यांनी हा सल्ला दिला असला, तरी इव्हाना यांनी हा सल्ला अमान्य केल्याचे म्हटले आहे. ‘रेझिंग ट्रम्प’ नामक इव्हाना यांनी लिहिलेले आत्मचरित्र काही काळापूर्वी प्रकाशित झाले असून, कम्युनिस्ट राजवट असलेल्या चेकोस्लोव्हेकियामधील वास्तव्यापासून न्यूयॉर्क मध्ये येऊन यशस्वी व्यावसायिक बनण्यापर्यंतचे आपल्या आयुष्यातील अनेक टप्पे इव्हाना यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये नमूद केले आहेत. यामध्ये डोनाल्ड यांची पत्नी म्हणून आपले आयुष्य कसे होते याचेही अनेक अनुभव इव्हाना यांनी कथन केले आहेत. डोनाल्ड आणि इव्हाना यांच्या तीन अपत्यांशी निगडित अनेक किस्सेही या आत्मचरित्रात आहेत.

इव्हाना आणि डोनाल्ड यांची प्रथम भेट १९७६ साली झाली असून तत्पूर्वी चेकोस्लोव्हेकियामध्ये त्या अभिनयक्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांचे पहिले पती आल्फ्रेड विन्केलमायर यांच्या बरोबर कॅनडा येथे स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. डोनाल्डशी भेट झाल्यानंतर अवघ्या एका वर्षातच दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ट्रम्प यांच्या व्यवसायामध्ये महत्वाची भूमिका बजावीत इव्हाना यांनी ट्रम्प यांच्या अनेक व्यवसायांची धुरा यशस्वी रित्या सांभाळली. डोनाल्ड यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर इव्हाना यांनी व्यावसायिक म्हणून स्वतंत्र रित्या काम सुरु केले. त्या काळामध्ये इव्हाना यांनी अनेक पुस्तके लिहिली असून, अनेक ब्रँडेड परफ्युम्स, कपडे आणि आभूषणे बाजारात आणली, आणि याही व्यवसायामध्ये अफाट यश मिळविले.

इव्हाना आणि डोनाल्ड १९९२ साली वेगळे झाले. त्यावेळी डोनाल्ड यांचे मार्ला मेपल्स यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याने इव्हाना आणि डोनाल्ड वेगळे झाले होते. मात्र वेगळे होऊन वीस वर्षे उलटून गेल्यानंतरही डोनाल्ड आणि इव्हाना यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच राष्ट्रपतीपदासाठी डोनाल्ड निवडणूक लढवीत असताना इव्हाना यांनी डोनाल्ड यांना समर्थन दिले होते. इव्हाना यांनी आजवर चार वेळा विवाह केले असून, मधल्या वेळात दोन इटालियन तरुणांच्या सोबतही त्यांचे प्रेमसंबंध असल्याने त्यांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहे.

Leave a Comment