विमानापेक्षा जलद गतीने प्रवास करणारी ‘फ्लोटिंग ट्रेन’ विकसित करणार चीन


तब्बल सहाशे किलोमीटर प्रती तास धावणाऱ्या मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेनचा प्रोटोटाईप चीनने विकसित केला असून, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रोटोटाईप तयार करण्यात आला आहे, त्या तंत्रज्ञानामध्ये ट्रेन चालविण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेट्सचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे ही ट्रेन ‘एअर कुशन’वर धावणार असून, त्यामुळे ट्रेनची चाके आणि रेल्वेचे रूळ यामधील घर्षण कमी होणार आहे. हे घर्षण कमी झाल्याने ट्रेनचा वेग वाढविणे शक्य झाले असून, सर्वसामान्य ट्रेन्सच्या वेगाच्या मानाने या ट्रेनचा वेग पुष्कळ जास्त असणार आहे. त्याचबरोबर ट्रेनच्या प्रवासामध्ये जाणविणारे धक्के आणि ट्रेनचा आवाजही पुष्कळच कमी होणार असल्याचेही म्हटले जात आहे.

चीनमध्ये जगातील सर्वाधिक वेगवान मॅगलेव्ह सर्व्हिस आधीपासूनच उपलब्ध असून ‘द शांघाई मॅगलेव्ह’ ही ट्रेनसेवा शांघाई विमानतळापासून सिटी सेंटरपर्यंत २००३ सालापासून कार्यरत आहे. ही ट्रेन चारशे तीस किलोमीटर प्रती तास धावू शकते. २०१७ सालापासून चीनमध्ये ‘फुक्सिंग बुलेट ट्रेन्स’ नागरिकांच्या सेवार्थ दाखल झाल्या. या ट्रेन बीजिंग-शांघाई मार्गवर कार्यरत असून, त्यामुळे १३०० किलोमीटर्सच्या या प्रवासाचा अवधी पुष्कळ प्रमाणत घटला आहे. या ट्रेन्स साडेतीनशे किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने प्रवास करीत असतात. पण आता ज्या ट्रेनचा प्रोटोटाईप तयार करण्यात आला आहे, त्या ट्रेन्स इतर बुलेट ट्रेन्सच्या मानाने खूपच वेगवान असून, या ट्रेनचा प्रवास विमानप्रवासापेक्षाही जलद असणार आहे.

सर्वसामान्यपणे शांघाई ते बीजिंग या बुलेट ट्रेनच्या प्रवासासाठी सर्वसाधारणपणे साडेचार ते साडेपाच तासांचा अवधी लागतो, पण नव्या वेगवान मॅगलेव्ह ट्रेनमुळे हा प्रवास केवळ साडेतीन तासांमधेच पूर्ण करता येणार आहे. मात्र ही ट्रेन प्रवाश्यांच्या सेवेमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यावर अनेक चाचण्या केल्या जाऊन या चाचण्या यशस्वी होऊन ही ट्रेन सर्वतोपरी सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच ही ट्रेन प्रवाश्यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे.

Leave a Comment