मोबाईल कंपन्यांची सूज उतरत आहे…!


मोबाईल फोनचा वापर सध्या देशात जवळपास सर्वत्र होत आहे. मोबाईल डेटा वापरण्यामध्ये भारत आता जगातील आघाडीचा देश बनला आहे. त्यामागे ग्रामीण आणि दूरवर असलेल्या भागांमध्ये पसरलेली मोबाईल सेवा खूप महत्त्वाची आहे.

“भारतातील मोबाईल सेवांचे शुल्क आता बहुधा जगातील सर्वात कमी शुल्क आहे, ज्यामुळे मोबाईल डेटा वापरण्यामध्ये आता भारत जगातील आघाडीचा देश बनू लागला आहे. गेल्या पाच वर्षांत मोबाईल डेटाचा मासिक वापर पन्नास पटींनी वाढला आहे. सध्या व्हॉईस कॉल आणि डेटा यांचे भारतातील शुल्क बहुधा जगात सर्वात कमी आहे. सध्या भारतात मोबाईल फोन आणि त्यांच्या भागांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्या दोनवरून 268 पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे अमाप रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत,” असे केंद्रीय अर्थ, कॉर्पोरेट व्यवहार, रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना सांगितले होते. मात्र ताजी आकडेवारी या आशेला छेद देणारी आहे. भारतात मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या एप्रिल महिन्यात काहीशी वाढली आहे, मात्र मार्च महिन्यात ही संख्या झपाट्याने खाली आली होती.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) आकडेवारीनुसार, जानेवारीनंतर ग्रामीण भागांतील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या सातत्याने खाली आली आहे. डिसेंबर महिन्यापासून ग्रामीण भागातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 2 कोटींनी कमी झाली आहे. इतकेच नाही तर रिलायन्स जियो सोडून अन्य मोबाईल कंपन्यांचे सक्रिय ग्राहकही कमी होत आहेत. सक्रिय ग्राहकांची संख्या गडगडून जून 2018च्या पातळीवर आली आहे.

सध्या बाजारात तीन प्रमुख कंपन्यांचे एकूण 91.1 कोटी सक्रिय ग्राहक आहेत. जून 2018 मध्ये हीच संख्या 93.3 कोटी आणि मे 2018 मध्ये 91.5 कोटी होती. याशिवाय एप्रिल 2019 मध्ये अन्य टेलीकॉम कंपन्यांचे एकूण सक्रिय ग्राहक 6.8 कोटी आहेत. एप्रिलमध्येच मोबाईल उद्योगातील एकूण सक्रिय ग्राहक 2.21 कोटींनी कमी होऊन 99.96 कोटींवर आले.

बीएन परीबा या कंपनीने मांडलेल्या माहितीनुसार, “भारती एअरटेल आणि व्होडाफोन, आयडिया या कंपन्यांनी सर्व्हिस व्हॅलिडिटी पॅक सादर केल्यानंतर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) वापरण्याचे प्रमाण वाढले होते, मात्र हे प्रमाण फारसे जास्त नव्हते.”

एअरटेलच्या सक्रिय ग्राहकांची संख्या 37 लाखांनी कमी झाली आहे, तर व्होडाफोन आयडियाचे सक्रिय ग्राहक 2.6 कोटींनी कमी झाले आहेत. नवीन 72 लाख ग्राहक जोडणारी जिओ ही एकमेव कंपनी ठरली आहे, मात्र नवीन ग्राहक मिळविण्याचा तिचा वेग आता मंदावला आहे.

ग्रामीण भागातील हे वापरकर्ते कमी का होत आहेत, हा प्रश्न दूरसंचार उद्योगाच्या तज्ञांना पडला आहे. त्याचे विश्लेषण करताना मोबाईल कंपन्या आणि विश्लेषकांनी असे मत मांडले आहे, की अनेक सिमचा वापर करण्याची ग्राहकांची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे ही आकडेवारी दिसत आहे. मोबाईल फोनचे देशात एकूण 110 कोटी वापरकर्ते आहेत. त्यांपैकी 70 कोटी वापरकर्ते एका नंबरचा म्हणजेच एका सिमचा वापर करतात. बाकीचे फोनधारक एकापेक्षा जास्त सिमचा वापर करतात. म्हणजेच 40 कोटी वापरकर्ते एकापेक्षा जास्त कंपन्यांचे ग्राहक आहेत.

येथे नोंद करण्यासारखी एक बाब म्हणजे भारतात ड्युएल सिम फोनचे प्रमाण 66.61 टक्के एवढे आहे आणि ते जगात सर्वाधिक आहेत. शिवाय एकापेक्षा जास्त फोन वापरण्याची प्रवृत्तीही भारतीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्यामुळे या कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या फुगलेली दिसते. मात्र ग्राहक आता आपले प्राथमिक सिम (ऑपरेटर) निवडत असून त्यालाच प्राधान्य देत आहेत. एमएनपीची संख्याही स्थिरावली आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांच्या मते, अनेक सिम असलेल्यांनी एकच सिम वापरण्यास सुरूवात केली आहे. तसेच मोबाईल कंपन्यांनीही निष्क्रिय सिम डिअॅक्टिव्हेट केले आणि कमी किमतीच्या प्लॅनचे ग्राहक कमी केल्यामुळेही ग्रामीण भागातील मोबाईलच्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.

काही तज्ञांच्या मते तर 90 कोटी मोबाईल कनेक्शन हीच भारतातील मोबाईल ग्राहकांची मर्यादा आहे. बाकी सर्व सूज आहे. आता ही सूज उतरायली लागली आहे, एवढेच यातून स्पष्ट होते.

Leave a Comment