‘जेट एअरवेज’चे कर्मचारीच होणार मालक


नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांचा एक समूह आणि ब्रिटनच्या आदि ग्रुपने ‘जेट एअरवेज’च्या ७५ टक्के समभागासाठी मिळून बोली लावण्याची घोषणा केली असून हा जेट एअरवेजला खरेदी करण्यासाठी एक प्रयत्न असेल. ‘जेट एअरवेज’ ही एनसीएलटीच्या प्रक्रियेचा सामना करणारी पहिलीच विमान कंपनी आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यातही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी अपयशी ठरली. एनसीएलटीमध्ये कंपनीविरुद्ध ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने २६ इतर कर्जदारांकडून २० जून रोजी दिवाळखोरीची याचिका दाखल करण्यात आली होती. बँकांचे जवळपास ८५०० करोड रुपये तसेच वेंडर, पट्टा देणारे आणि कर्मचारी इत्यादी २५,००० करोड रुपये जेट एअरवेजवर थकबाकी आहे. एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून याची घोषणा कर्मचाऱ्यांचा समूह आणि आदि ग्रुपने केली आहे.

याबाबत संयुक्तरित्या देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय विमान उद्योगाच्या इतिहासात हा एक नवीन प्रयोग असेल. एखाद्या विमान कंपनीचा प्रत्येक कर्मचारीच त्या कंपनीचा मालक असेल, हे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही घोषणा पूर्णत्वास येत असल्याचे म्हटले तर वावगे ठरु नये. मागील १७ एप्रिलपासून आर्थिक संकटांशी सामना करणारी जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे बंद आहेत. कर्मचाऱ्यांच्या समूहाने २५०० ते ५००० करोड रुपयांची तयारी जेट एअरवेजसाठी केली आहे.

Leave a Comment