एव्हरेस्टपेक्षा कमी उंची असूनही या शिखरावर होऊ शकली नाही यशस्वी चढाई


जगातील सर्वाधिक उंची असलेल्या माउंट एव्हरेस्टवर आजवर अनेकांनी यशस्वी चढाई केली आहे. किंबहुना एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. मात्र एक पर्वतशिखर असेही आहे ज्याची उंची एव्हरेस्टपेक्षा कमी असूनही आजवर हे शिखर कोणीही सर करू शकलेले नाही. या पर्वताचे नाव गंगखार पुनसुम असून हा पर्वत चीन आणि भूतान या दोन देशांच्या सीमेवर आहे. या पर्वताची उंची २४,८४० फुट असून, एवरेस्ट पर्वताची उंची त्याहून पुष्कळच अधिक, २९,०२९ फुटांची आहे. तरीही आजवर गंगखार पुनसुम पर्वतावर यशस्वी चढाई होऊ शकलेली नाही.

या पर्वतावर चढाई करणे माउंट एव्हरेस्टवरील चढाईच्या मानाने काहीसे कमी कष्टांचे आहे हे खरे असले, तरी गिर्यारोहक या पर्वतापासून लांबच राहणे पसंत करतात. १९९४ साली काही गिर्यारोहकांनी हे पर्वतशिखर सर करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यावेळी चीन सरकारच्या मदतीने भूतान सरकारने या मोहिमेला परवानगी नाकारली. त्यामुळे गिर्यारोहकांना हे शिखर सर न करताच परतावे लागले. तेव्हापासून या पर्वतावर चढाई करण्यास भूतान सरकारच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी घालण्यामागे एक महत्वाचे कारण आहे.

भूतानच्या नागरिकांसाठी गंगखार पुनसुम हे एक पवित्र धर्मक्षेत्र असल्याने गिर्यारोहकांनी केवळ हौस म्हणून येथे येऊन या स्थळाची पवित्रता भंग होऊ नये या साठी या पर्वतावर चढाई करण्यास भूतान सरकारच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने १९९४ साली या पर्वतावर चढाईच्या पहिल्या प्रयत्नानंतरच भूतान सरकारने नवा कायदा पारित केला होता. या कायद्यानुसार वीस हजार फुटांपर्यंत उंची असणाऱ्या पर्वतांवर चढाई करण्यासाठी गिर्यारोहकांना अनुमती देण्यात आली असून, त्यापेक्षा उंच पर्वतांवर चढाई करण्यास सरकारच्या वतीने अनुमती नाही.

Leave a Comment