भारतीय संघाला जो पराभूत करेल तोच विश्वविजेता होईल


विश्वचषकातील साखळी सामन्यात भारतीय संघाने गुरूवारी वेस्ट इंडिज संघाचा धावांनी 125 धावांनी धुव्वा उडवला. भारताने यासोबतच उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. भारताचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा सहा सामन्यांतील पाचवा विजय ठरला असून भारत हा एकमेव संघ अद्याप या स्पर्धेत अजिंक्य आहे.

दरम्यान, अनेक माजी दिग्गजांनी विश्वचषकातील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूर सोशल मीडियावर देखील बदललेले पहायला मिळत आहेत.


इंग्लंडच विजयाचा प्रबळ दावेदार आहे, आणि घरच्या मैदानावर विश्वचषक असल्याने परिस्थितीचा फायदा उचलत इंग्लंड विश्वचषक जिंकेल अशा फुशारक्या आतापर्यंत मारणारे खुद्द इंग्लंडचेच माजी खेळाडू आणि कर्णधार देखील आता भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो असे म्हणत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने तर यापुढे जात एक विधान केले आहे. वॉनने भारत विश्वचषक जिंकू शकतो असे थेट म्हणणे टाळले पण भारताला जो संघ पराभूत करेल तोच संघ हा विश्वचषक जिंकेल, असे ठाम वक्तव्य त्याने केले आहे. भारतीय संघ गुरूवारच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवेल हे निश्चित झाले मायकल वॉन याने त्याचवेळेस भारतीय संघाला जो संघ पराभूत करेल तोच विश्वचषक जिंकेल, आणि या मताशी ठाम असल्याचे वक्तव्य ट्विटरद्वारे केले आहे. मायकल वॉन ट्विटरद्वारे सातत्याने भारतीय संघावर आणि संघातील खेळाडूंवर निशाणा साधत असतो किंवा टीका करत असतो, त्यामुळे त्याने केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सकडून त्याची चांगलीच खिल्ली देखील उडवली जात आहे.

Leave a Comment