या क्रिकेटपटूला रिप्लेस करणार ऋषभ पंत?


लंडन : भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजला नमवत उपांत्यफेरीतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. पण भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, विराट आणि राहुल मोठी खेळी करतात तेव्हा मोठे आव्हान उभा करता येते. तर प्रतिस्पर्धी संघाला जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्या माऱ्यासमोर धावा करणे कठीण होते. भारताने गेल्या दोन वर्षांत मिळवलेल्या विजयात हेच मोठे कारण आहे. दरम्यान मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांचा फॉर्म भारतासमोर चिंतेचा विषय आहे. मधली फळी अनेकदा मोक्याच्या क्षणी ढेपाळलेली दिसली आहे.

भारताची आघाडीची फळी वेस्ट इंडिज विरोधातही फेल ठरली. रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण राहुल 48 धावावंर बाद झाला. त्यांनतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरला या सामन्यातही चांगली फलंदाजी करता आली नाही. शंकर 14 धावा करत बाद झाला. तर,केदार जाधवने केवळ 7 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि धोनी यांनी भारताचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंनी सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली आणि भारताने वेस्ट इंडिजपूढे 269 धावांचे आव्हान ठेवले.

भारताने विश्वचषक स्पर्धेमध्ये 5 सामन्यात चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्याने त्याला सलामीला उतरावे लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच रोहित आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावगतीचा वेगही मंदावतो. सध्यातरी मधल्या फळीतील फलंदाजी भारताची डोकेदुखी ठरत आहे.

सध्या विश्वचषक स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विजय शंकरने चांगली फलंदाजी न केल्यामुळे शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यास हरकत नाही. तसेच, विजय शंकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 सामन्यात 223 धावा केल्या असल्यामुळे चाहत्यांनी ऋषभ पंतला संघात स्थान द्यावे अशी मागणी केली आहे.

Leave a Comment