मुंबईची जमीन म्हणजे मंदीतही चांदी


मुंबई हे तसे प्राचीन बेट किंवा बेटांचा समूह. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळी मुंबई, कुलाबा, ओल्ड वुइमेन्स आयलंड, माझगाव, वरळी, माहीम व माटुंगा अशी निरनिराळी सात बेटे या समुहात होती. या बेटांना विलग करणाऱ्या खाड्या निरनिराळ्या वेळी वाळू आणि मातीची भर टाकून बुजविण्यात आल्या. ही बेटे एकमेकांस जोडून सलग अशी आजची मुंबई आकाराल आली. तरीही नंतर शहराच्या वाढीकरिता जागा अपुरी पडू लागल्यामुळे मुंबईच्या दक्षिण टोकाच्या पश्चिमेस किनाऱ्यालगत समुद्रात भर घालून पाण्याखालील जमीन नागरी वस्तीकरिता संपादन करण्यात आली. आज आपण जो मरीन ड्राईव्ह, ब्रेबॉर्न स्टेडियम, चर्नीरोड ते मरीन लाईन्सचा भाग पाहतो, या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेली खेळाची मैदाने आणि नरिमन पॉईँट वगैरे पाहतो ती या जागेवर उभी आहेत. वाळू व रेतीची ही भर काही प्रमाणात जमीन व डोंगर खणून दूर अंतरावरून आणलेल्या मातीने घालण्यात आली आणि काही प्रमाणात या भागाच्या पूर्वेस व पश्चिमेस असलेल्या समुद्राच्या तळातून काढलेल्या मातीने व गाळाने घालण्यात आली. याच पद्धतीने आणखी सुमारे दोनशे हेक्टर जमीन मिळविण्यात आली.

हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे मुंबईत जमीन आणि जागा या इतक्या बहुमोल वस्तू का आहेत, हे कळून येईल. देशाची व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईत बाकी सर्व काही मिळेल, पण राहायला जागा मिळणार नाही असे म्हणतात ते उगीच नाही. या शहरात निवासी मालमत्तांच्या किमती आणि घरांची विक्री स्थिर राहिली आहे, मात्र जमिनीचे सौदे अत्यंत चढ्या किमतीने होत आहेत.

अलीकडेच जपानमधील एक दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी सुमीटोमो समुहाने मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक भूखंड (प्लॉट) तब्बल 2,238 कोटी रुपये मोजून विकत घेतला. केवळ तीन एकरच्या या भूखंडासाठी लागलेली ही आतापर्यंतची विक्रमी बोली आहे. म्हणजेच सुमीटोमोने प्रति एकर 745 कोटी रुपये दिले. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात महागडा जमिनीचा सौदा आहे. सुमीटोमोने जमिनीचा हा सौदा आपल्या वापरासाठी केला आहे. त्यात मुद्रांक शुल्क आणि अन्य एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) यांचा खर्च समाविष्ट नाही.

याच प्रमाणे पश्चिमी उपनगरातील बोरीवलीत रुणवाल समुहाने केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी (सीसीआय) करार केला असून हा सौदा 530 कोटी रुपयांचा आहे. त्या बदल्यात रुणवाल समुहाला 8 एकर जमीन मिळणार आहे म्हणजेच 66.3 कोटी रुपये प्रति एकर. याच भागात ओबेरॉय रियल्टी कंपनीने 2015 साली 25 एकर जमिनीसाठी 1200 कोटी रुपये दिले होते. तो सौदा 48 कोटी रुपये प्रति एकर भावाने झाला होता. अगदी अलीकडे गोदरेज प्रॉपर्टीजने प्रसिद्ध आर. के. स्टूडियो विकत घेतला. चेंबूर येथे असलेल्या राज कपूर यांच्या या स्टुडियोच्या दोन एकर जागेसाठी गोदरेजने 185 कोटी रुपये दिले होते.

गंमत म्हणजे रिअल एस्टेट किंवा बांधकाम क्षेत्रात मंदी असून बाजारपेठ अत्यंत दबावाखाली आहे, असे बिल्डरांचे म्हणणे आहे. तरीही जमिनीचे भाव घसरत नाहीत. मुंबई महानगर प्रदेश परिक्षेत्रात (एमएमआर) खासगी विकसकांनी बांधलेली टूबीएचकेपेक्षा मोठ्या आकाराची अडीच लाखांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत, असा अंदाज आहे. आधी केंद्र सरकारची नोटबंदी आणि त्यानंतर 12 टक्के जीएसटी यामुळे रिअल इस्टेटचे कंबरडे मोडले आहे. त्यात भर म्हणजे एकूण किमतीवर आकारली जाणारी सात टक्के स्टॅम्प ड्युटी. त्यामुळे घराच्या किमतीपेक्षा तब्बल 19 टक्के अधिक किंमत मोजावी लागते. यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. हीरानंदानी कम्युनिटीजचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हीरानंदानी यांचा मते, बांधकाम क्षेत्रात दबाव वाढला आहे. तरीही कोणीही भाव कमी करायला तयार नाही.

मुंबई शहराच्या आकर्षणापायी देशाच्या सर्व भागांतून रोजी-रोटी कमावण्यासाठी लोक येथे येतात. मात्र मुळातच जमीन नसल्याने शहराचा भौगोलिक विस्तार मर्यादित झाला आहे. त्यातूनच धारावी सारखी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी उभी राहिली. सन 2011 च्या जनगणनेनुसार, मुंबईतील 54 टक्के लोक झोपडपट्ट्यांत राहतात. त्यामुळेच तर मुंबईची जमीन मंदीतही चांदी ठरते!

Leave a Comment