केवळ एका स्पेलिंगच्या चुकीमुळे करावा लागला चौदाशे किलोमीटरचा प्रवास


अनेकदा इंग्रजी भाषेमध्ये काही तरी लिहित असताना एखाद्या स्पेलिंगमध्ये झालेल्या चुकीने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. जर्मनीमध्ये बर्लिन शहरामध्ये राहणाऱ्या एका वयस्क आजोबांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. हे आजोबा बर्लिन शहराचे निवासी असून, रोममधील व्हॅटिकन सिटी येथे जाऊन सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरूंचे म्हणजेच पोपचे दर्शन घ्यावे अशी इच्छा गेले अनेक दिवस त्यांच्या मनामध्ये होती. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आजोबा आपल्या गाडीमधून रोमकडे जाण्यासाठी निघाले.

आजकाल आपल्या वाहनाने प्रवास करत असताना मोबाईल फोन वर असलेली अनेक अॅप्स प्रवासात मार्गदर्शक ठरत असतात. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग, त्या मार्गाला पर्यायी इतर मार्ग, रस्त्यामध्ये असणारे महत्वाचे लँडमार्क्स, हॉटेल्स, मोटेल्स, रुग्णालये, रेस्टॉरंट इत्यादींची माहिती देखील या अॅप्स द्वारे मिळत असते. आजोबांनी देखील आपल्या मोबाईल अॅपमध्ये आपल्याला जाण्याच्या ठिकाणाचे नाव ‘एन्टर’ केले आणि अॅपने दिलेल्या सूचनांच्या अनुसार आजोबांचा प्रवास मजेत सुरु झाला.

तब्बल चौदाशे किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर मोबाईल अॅपने आजोबांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचल्याची सूचना दिली. ती सूचना ऐकून आजोबा चांगलेच गोंधळले, कारण ते पोहोचले ते ठिकाण रोममधील व्हॅटिकन सिटी नव्हेतच. त्यामुळे अर्थातच पोपचे दर्शन होण्याची सुतराम शक्यता नव्हती. आपण रोम म्हणून नक्की कुठे पोहोचलो हे आजोबांच्या लक्षात येईना. त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईलवरील अॅप तपासले असता ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणाचे नावच चुकीचे एन्टर केले गेल्याचे त्याच्या लक्षात आले. आजोबांना जायचे होते ‘ROME’ या ठिकाणी, मात्र त्यांनी मोबाईल वरील अॅपवर आपले ‘डेस्टीनेशन’ ‘ROM’ असे एन्टर केल्याने ते तब्बल चौदाशे किलोमीटरचा प्रवास करून पश्चिम जर्मनीतील नॉर्थ ऱ्हाईन वेस्टफेलीया येथील रोम शहरात पोहोचले होते. केवळ एका लहानशा स्पेलिंगच्या चुकीने आजोबांना निष्कारण चौदाशे किलोमीटरचा प्रवास करून अखेरीस पोपना भेटण्याची इच्छा अपूर्ण ठेवतच बर्लिनला परतावे लागले.

Leave a Comment