30 विद्यमान आमदारांना नारळ देणार भाजप?


मुंबई : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील मुख्य सर्वच राजकीय पक्ष गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढले. पण आता आघाडी आणि युती अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने पाऊले टाकायला भाजपनेही सुरुवात केली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर चांगले यश मिळवत 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजपने आताच्या लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करत केंद्रात दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. पण असे असले तरीही भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी रणनीती तयार केली आहे. भाजपकडून यानुसार 25 ते 30 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडून आमदारांचा तिकीट कापताना काही निकष लावण्यात येणार आहेत. ज्या मतदारसंघांत पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले नाही, अशा आमदारांचे तिकीट भाजपकडून कापण्यात येणार आहे. तसेच मागील 5 वर्षांत लोकप्रतिनिधी म्हणून ज्या आमदारांनी प्रभावी कामगिरी केली नाही, अशा आमदारांनाही भाजप उमेदवारी देणार नाही.

शिवसेनेच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केले होते. त्याबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आमचे सगळे ठरले आहे. यापुढे सगळे समसमान पाहिजे, अशी भूमिका जाहीर केली. पण भाजपने उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला धक्का दिला. भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असा दावा केल्याने युतीत वादाची ठिणगी पडली होती.

Leave a Comment