महिन्याभरात दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू – रामदास कदम


मुंबई – आगामी एका महिन्याभरात दुध विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी लागू करण्यात येणार आहे. विधानसभेत याबाबतची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. दररोज 1 कोटी म्हणजेच 35 टन प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर महाराष्ट्रात करण्यात येतो. यावर वचक बसवण्यासाठी दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लास्टिक बंदी राज्यात लागू झाली असली तरी प्लास्टिक पिशव्यांचा वापर दुधासाठी सुरू असल्याचे काही सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कदम यांनी त्यावर उत्तर देताना ही माहिती दिली.

50 पैसे डिपॉझिट म्हणून दुधाची पिशवी घेताना घ्यायचे आणि 50 पैसे ती पिशवी परत केल्यानंतर परत करायचे, सर्व कंपन्यांनी ही योजना मान्य केली आहे. तसेच यावर येत्या महिन्याभरात अंमल करण्यात येईल. दररोज 35 टन प्लास्टिक पिशव्यांचा वापर राज्यात दुधासाठी करण्यात येतो. त्यातून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच प्लास्टिक बंदीपूर्वी राज्यात 1 हजार 200 कचरा निर्माण होत होता. परंतु प्लास्टिक बंदीनंतर त्यात घट होऊन तो 600 टन झाला आहे. तसेच राज्यात 80 टक्के प्लास्टिक हे गुजरातमधून येते. ते बंद करण्यासाठी गुजरात सीमेवर स्वत: जाऊन कारवाई केली असल्याचेही कदम यांनी सभागृहाला सांगितले.

Leave a Comment