पाकिस्तानचे ढोंग हाच कर्तारपूर मार्गिकेचा पेच


पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला दुटप्पीपणा उघड केला आहे. पाकिस्तानने मोठी फुशारकी मारत कर्तारपूर मार्गिका उघडाय तयारी दाखवली खरी, परंतु आता तो अनेक अडचणी उभ्या करत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे ढोंग तर समोर येत आहेच मात्र कर्तारपूरच्या मार्गाने जाणाऱ्या शीख यात्रेकरूंच्या दर्शनाच्या आशाही मावळत आहेत.

कर्तारपूर येथील गुरद्वारा दरबार साहिब हा पंजाबच्या सीमेपासून केवळ काही अंतरावर आहे. लाहोरपासून १२० किलोमीटर अंतरावरील नारोवाल जिल्ह्यात हा गुरुद्वारा आहे. शिखांचे पहिले गुरु व शीख पंथाचे संस्थापक गुरू नानक यांचे येथे १७ वर्षे ९ महिने वास्तव्य होते. त्यांचा सर्व परिवार येथेच होता. त्यांचे देहावसान कर्तारपूर येथे झाले. त्यांच्या स्मरणार्थ रावी नदीच्या काठी मंदिर बांधलेले आहे. डेराबाबा नानक शहरी दरबार साहेब नावाचे हे सुंदर मंदिर (गुरुद्वारा) असून जगभरातून शीख भाविक तेथे यात्रेसाठी येतात.

मात्र व्हिसाशिवाय तेथे जाण्यास परवानगी नसल्यामुळे बहुतांश यात्रेकरू तेथे जाऊ शकत नाहीत. ज्यांना जाण्याची परवानगी मिळते, त्यांनाही लांबचा रस्ता घ्यावा लागतो. या तीर्थस्थळाशी शीख समुदायाच्या भावना जोडलेल्या असल्यामुळे कर्तारपूरला जाणारी मार्गिका दोन्ही बाजूने खुली करावी, अशी मागणी भारत सरकार दीर्घ काळापासून करत आहे. इम्रान खान पंतप्रधान बनले तेव्हा त्यांच्या शपथविधी समारंभाला पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू हेही गेले होते. कर्तारपूरसाठी रस्ता देण्यास पाकिस्तान तयार झाला आहे, असे त्यांनी परत आल्यावर सांगितले होते.

त्यानंतर भारताकडून जे जे प्रस्ताव पाठवण्यात आले त्यांना पाकिस्तानने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तसेच अनेक प्रस्तावांना त्याने काही प्रतिसाद दिलेला नाही. दररोज पाच हजार दर्शनार्थ्यांना जाण्याची परवानगी द्यावी आणि विशेष दिवशी ही संख्या 10 हजारांपर्यंत वाढवावी, असा प्रस्ताव भारताने ठेवला होता. तसेच दर्शनार्थ्यांना जथ्थ्याच्या स्वरूपात जाऊ द्यावे. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त अन्य देशांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही या मार्गावरून जाण्याची मुभा द्यावी, असेही भारताने म्हटले होते. मात्र यातील कोणताही प्रस्ताव मान्य करण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे.

दररोज केवळ ७०० दर्शनार्थ्यांना जाण्याची परवानगी मिळेल आणि त्यासाठी सुद्धा विशेष परमिट बनवावे लागेल. अन्य देशांमध्ये में राहणाऱ्या भारतीय नागरिकांना परमिटवर जाण्याची परवानगी मिळणार नाही. एका जथ्थ्यात १५ पेक्षा अधिक जण जाऊ शकत नाहीत, असे पाकिस्तानने बजावले आहे.

आणखी वाईट म्हणजे एवढ्या अटी घालूनही कर्तारपूर मार्गिका उघडण्याचे लक्ष्य अजून दूरच आहे. जथ्थ्याने गेल्यास सर्व लोक केवळ दर्शनासाठी जात आहेत की त्यात काही समाजकंटकही आहेत, हे ओळखणे अवघड होईल. मोठ्या संख्येने श्रद्धाळूंना जाऊ दिल्यास दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणे कठीण जाईल, असा शहाजोग तर्क पाकिस्तानने दिला आहे. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणाव्या लागतील. एक तर भारतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालतो हे जगजाहीर आहे. दुसरे म्हणजे भारतीय सीमेपासून कर्तारपूर काही फार दूर नाही. एवढ्या छोट्या रस्त्यावरून जाणाऱ्या श्रद्धाळूंवर सहज नजर ठेवता येऊ शकते. शिवाय जर श्रद्धाळूंची नोंदणी होणारच असेल तर त्यांची ओळख पटवणे आणि किती लोक दर्शनासाठी गेले होते व किती परत आले, हे माहीत करणे फार अवघड नाही. भारतात अमरनाथ गुहा आणि मानसरोवर यात्रेच्या वेळेस यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या व्यवस्था केल्या जातातच. त्याही पेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही, की कर्तारपूरला जाणाऱ्या यात्रेकरूंवर केवळ पाकिस्तानच नव्हे तर भारतही लक्ष ठेवणार आहे. कारण पाकिस्तानातून येणारे घुसखोर आणि त्यांनी माजवलेला दहशतवाद ही भारताचीच डोकेदुखी आहे.

इतकेच नाही तर या मार्गिकेच्या बांधणीकरिता समन्वयासाठी पाकिस्तानकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. तीत पाकिस्तानने खलिस्तान समर्थकांचा समावेश केला होता. शिवाय ‘कर्तारपूर’चे नाव ‘खलिस्तान स्थानक’ ठेवले पाहिजे. याविषयी मी परराष्ट्र मंत्रालयाशी बोलणार आहे’, असे वक्तव्य पाकचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी केले यावर्षी मार्चमध्ये केले होते.

खरे म्हणजे पाकिस्तानला शीख यात्रेकरूंना येऊ द्यायचेच नाही. केवळ आपण खूप उदारवादी असून भारतासमोर मैत्रीचा हात पुढे करत आहोत, हे जगाला दाखविण्यासाठी त्याचे हे मानभावी ढोंग आहे. पाकिस्तानचे ढोंग हाच कर्तारपूर मार्गिकेचा खरा पेच आहे.

Leave a Comment