याबाबतीत अव्वल ठरला आहे पाकिस्तानी संघ


आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघदेखील उत्तम कामगिरी करत आहे. ५ पैकी ४ सामने जिंकून भारताने ९ गुणांची कमाई केली आहे. मात्र पावसामुळे भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द करण्यात आल्यामुळे सध्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. पण भारतीय संघ एका बाबतीत तळाशी आहे आणि भारतासाठी आणि भारतीय क्रिकेटरसिकांसाठी ही गोष्ट सुखावह आहे.

क्रिकेटमधील ‘कॅचेस विन मॅचेस’ अशी एक म्हण आहे. जितके जास्त झेल संघातील खेळाडू टिपतात, तो संघ तितका सामना जिंकण्याची शक्यता देखील वाढते. ही म्हण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतदेखील खरी ठरताना दिसते आहे. पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये झेल सोडण्याच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत एकूण १४ झेल पाकच्या संघाकडून सुटले आहेत. तर भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत केवळ १ झेल सोडला आहे.

इंग्लंडचा संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत १२ झेल इंग्लंडच्या संघाने सोडले आहेत. तर त्या खालोखाल न्यूझीलंडच्या संघाने एकूण ९ झेल सोडले आहेत. पहिल्याच फेरीत धक्कादायक ‘एक्झिट’ घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून ८ झेल सुटले आहेत, तर विंडीजकडून ६ झेल सुटले आहेत. ऑस्ट्रलिया आणि बांगलादेश या दोघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीमध्ये खूप फरक असला तरी त्यांनी या बाबतीत मात्र साम्य राखले आहे. या दोनही संघाकडून एकूण ४ झेल सुटले आहेत. तर श्रीलंकेकडून ३ आणि अफगाणिस्तानकडून केवळ २ झेल सुटले आहेत.

Leave a Comment