मायावती व अखिलेश – गरज सरो नि वैद्य मरो


राजकारणात संधीसाधू युत्या आणि आघाड्या ही सर्रास होणारी बाब आहे. त्यात उत्तर प्रदेशातील मायावती यांचा राजकीय इतिहासच मुळात संधीसाधू राजकारणी असा आहे. त्यामुळेच समाजवादी पक्षाशी फारकत घेऊन अखिलेश यादव यांना एकटे सोडण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे कोणालाही आश्चर्य वाटायचे कारण नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षातील खडाखडीसतत वाढती राहिली आहे. खासकरून मायावतींचा पारा तर दिवसेंदिवस चढता राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुका एकट्याने लढण्याची घोषणा करून त्यांनी सपशी आपली युती आयसीयूत ढकलली होती. त्यानंतर आता या युतीची कायमस्वरूपी इतिश्री करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर सपशी युती करणे ही आपली चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपला एकही जागा मिळाली नव्हती. ती संख्या यंदाच्या निवडणुकीत 10 जागांवर गेली आहे. तरीही सपशी युतीचा आपल्याला शून्य लाभ झाल्याचा त्यांचा दावा आहे.

आमचे 10 खासदार हे सपच्या जीवावर निवडून आलेले नाही. तसे असते तर यादव कुटुंबियांचे सदस्यही निवडणुकीत पडले नसते. उलट सपच्या कमजोरीमुळे आमचे नुकसान झाले. अखिलेश यादव हे अपरिपक्व राजकारणी आहेत. निवडणुकीनंतर अखिलेश यांनी मला फोनसुद्धा केला नाही, असे सांगत मायावती यांनी सप आणि मुलायमसिंह यादव यांच्यावर घणाघाती शाब्दिक हल्ला केला आहे.

खरे तर लोकसभा निवडणुकीत अखिलेश आणि मायावती यांनी हातमिळवणी केली तेव्हाच भल्या-भल्या राजकीय पंडितांनी तोंडात बोटे घातली होती. कारण वर्षानुवर्षे एकमेकांचे हाडवैरी असलेल्या दोन व्यक्तिमत्त्वांनी एकत्र यायचे ठरवले होते. मायावती आणि अखिलेश यांच्या या मीलनाला कारणीभूत झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रेट्यामध्ये बसपला एकही जागा मिळाली नव्हती. त्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजपला विजयरथ धावत राहिला. त्यामुळे राजकीय मजबुरीतून हे घडले होते. भाजप हा समान शत्रू असल्यामुळे या दोघांनी युती केली. गंमत म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर ही युती तुटेल, असे भाकीत मोदी यांनी केले होते. ते आज तंतोतंत उतरले आहे.

या पक्षांच्या या सोशल इंजिनिअरिंगमुळे भाजपला मोठा फटका बसेल, असा राजकीय तज्ञाचा अंदाज होता. त्याला इतिहासाचाही आधार होता. कारण 25 वर्षांपूर्वी सप-बसपने असेच एकत्र येऊन भाजपवर मात केली होती. त्यावेळी बाबरी मशीद विध्वंसानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू होती. बाबरी मशीद प्रकरणामुळे ध्रुवीकरण सर्वोच्च पातळीवर पोचले होते. म्हणून 1993मध्ये सप-बसपने जोडी जमवली. त्यामुळे सत्तेत परत यायचे स्वप्न भाजपला पूर्ण करता आले नव्हते.

मात्र यावेळी झाले उलटेच. मोदी लाटेत, नव्हे सुनामीत, सप आणि बसपला आपले अस्तित्त्व टिकविणे जिकीरीचे झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी सपशी युती करताना मायावतींनी गेस्ट हाऊस कांड विसरले असल्याची ग्वाही दिली होती. मात्र 1995 साली घडलेले हे गेस्ट हाऊस प्रकरण आजही मायावतींच्या मनात ताजे असणार, यात शंका नाही.

मात्र युतीच्या एक वर्षाच्या आतच दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी उद्भवायल्या लागल्या. अखेर 1995च्या उन्हाळ्यात गेस्ट हाऊस कांड घडले. त्यावर्षी मे महिन्यात मायावती भाजपला पाठिंबा देणार आहेत, अशी चर्चा चालू झाली होती. भाजपनेही मायावती यांना आपल्या बाजूने वळवण्याचे सातत्याने प्रयत्न चालवले होते. मायावतींनी मुलायमसिंह सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. मुलायम यांना निर्णय कळविल्यानंतर 2 जून 1995 रोजी मायावतींनी लखनऊ येथे गेस्ट हाऊसमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. सपचे कार्यकर्ते तेथे हजारोंच्या संख्येने जमा झाले आणि तिथे उपस्थित बसपा कार्यकर्त्यांना मारहाण करू लागले. परिस्थिती चिघळल्याचं पाहून मायावतीही एका खोलीत लपल्या आणि तेवढ्या वेळात बसपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पोलिसांना फोन केला, मात्र त्यावेळी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. असं म्हणतात की, त्यावेळी सपा कार्यकर्त्यांनी दरवाजा तोडून मायावतींशी असभ्य वर्तन आणि मारहाणही केली होती. पण, सुदैवाने मायावती त्यातून वाचल्या.आता पराभवानंतर मायावतींच्या त्या जखमा ताज्या झाल्या असल्या तर नवल नाही. त्यामुळेच मुलायमसिंह यादव हे त्यांना पुन्हा शत्रू वाटायला लागले आहेत. मुलायमसिंह यांनीच आपल्याला ताज कॉरिडोर प्रकरणात अडकविल्याचा त्यांना संशय आहे.

खरे म्हणजे अखिलेश यांनी मायावतींसमोर खूपच नमते घेतले होते. मायावतींचे नेतृत्वही त्यांनी मान्य केले होते.मात्र या युतीचा काही फायदा होत नाही असे पाहून मायावतींना तिला पूर्णविराम देणेच योग्य असल्याचे मानले आहे. त्यामुळे मायावतींचा संधीसाधू चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. गरज सरो नि वैद्य मरो ही म्हण त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे.

Leave a Comment