ब्रिटीश करदाते भरणार प्रिन्स हॅरीच्या घराच्या नूतनीकरणाचे बिल


ब्रिटीश शाही घराण्याचे नवदाम्पत्य प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांना गेल्याच महिन्यात अपत्य झाले असून, ब्रिटीश घराण्यात नवा राजपुत्र जन्माला आला आहे. राजपुत्राचे नाव आर्ची ठेवण्यात आले असून आता आर्ची दोन महिन्याचा होत आहे. प्रिन्स हॅरी आणि मेघन विवाहबद्ध झाल्यानंतर काही महिने नॉटिंगहम कॉटेजमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर प्रिन्स हॅरीचा थोरला भाऊ विलियम त्याच्या परिवारासमवेत रहात असलेल्या केन्सिंग्टन पॅलेसमधील अपार्टमेंट मध्ये हॅरी रहावयास जाणार असल्याचेही म्हटले जात होते. मात्र हॅरी आणि मेघन यांना प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहण्याची इच्छा असल्याने त्यांनी फ्रॉगमोर कॉटेज येथे वास्तव्यास जाण्याचा निर्णय घेतला. मेघनच्या प्रसुतीच्या आधी काही दिवस हे स्थलांतरण होण्याचे नक्की झाल्याने या वास्तूच्या नूतनीकरणास लगेचच सुरुवात झाली.

फ्रॉगमोर कॉटेजच्या इमारतीमध्ये आधी पाच निरनिराळी अपार्टमेंट्स होती. या सर्व अपार्टमेंट्स एकत्र करून आता एकच मोठे प्रशस्त निवासस्थान तयार करण्यात आले आहे. हॅरी आणि मेघनच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन आणि त्यांना लवकरच होणाऱ्या अपत्याच्या गरजा लक्षात घेऊन या वास्तूचे नुतनीकरण करण्यात आले आहे. फ्रॉगमोर कॉटेज ही वास्तू अठराव्या शतकामध्ये निर्माण केली गेली असल्याने त्यामध्ये आताच्या काळानुसार सोयी सुविधा करवून घेणे महत्वाचे असून, इमारतीच्या अनेक भागांची डागडुजीही करणे आवश्यक होते. त्यामुळे नूतनीकारणाचे काम गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरु केले जाऊन या वर्षी मार्च महिन्यामध्ये संपुष्टात आले. या नूतनीकरणासाठी एकूण २.४ मिलियन पाउंड्सचा खर्च आला असून, हा खर्च शाही परिवार स्वतःच्या शाही खजिन्यातून करणार नसून, या खर्चाचा बोजा सरकारी तिजोरीवर, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या ब्रिटीश करदात्यांवर पडणार आहे.

या खर्चाच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता असून, काही राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी या खर्चाचे तपशीलही मागितले असल्याचे समजते. इतके जास्त पैसे केवळ शाही दाम्पत्याच्या खासगी निवासस्थानावर खर्च करण्याच्या ऐवजी हीच रक्कम एखाद्या समाजकल्याणकारी उपक्रमासाठी खर्च करणे जास्त योग्य ठरले असते असे मत या संघटनांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment